kaushalya logistics Lists at Premium : कौशल्या लॉजिस्टिक्स या कंपनीनं शेअर बाजारात दमदार पदार्पण केलं आहे. कंपनीचे शेअर्स ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नफ्यासह १०० रुपयांवर सूचीबद्ध झाले आहेत. आयपीओमध्ये ७५ रुपयांना वितरित झालेल्या या शेअरवर गुंतवणूकदारांना थेट २५ रुपये नफा झाला आहे.
कौशल्या लॉजिस्टिक्सचा आयपीओ २९ डिसेंबर २०२३ रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता. कौशल्या लॉजिस्टिक्सनं आयपीओच्या माध्यमातून ३६.६० कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. तो ३ जानेवारीपर्यंत खुला होता. आज पहिल्या दिवशी या कंपनीचा शेअर थेट १०५ वर गेला. त्यामुळं गुंतवणूकदार खूष झाले.
कौशल्या लॉजिस्टिक्स ही कंपनी ऑगस्ट २००७ मध्ये सुरू झाली. ही कंपनी एका मोठ्या सिमेंट कंपनीला क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग सेवा पुरवते. याशिवाय कंपनी ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे इलेक्ट्रॉनिक्स आणि गृहोपयोगी उपकरणं वितरित करते.
कौशल्या लॉजिस्टिक्सचा आयपीओ एकूण ३९०.८८ पट सबस्क्राइब झाला. त्यातील किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ३७५.४४ पट सबस्क्राइब झाला. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) विभागात हा आयपीओ ८४७.८८ पट सबस्क्राइब झाला. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स विभागात (QIB) आयपीओला ९२.६२ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं.
किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्याची मुभा होती. एका लॉटमध्ये १६०० शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना १२०००० रुपये गुंतवावे लागले. आयपीओ येण्याआधी कंपनीमध्ये प्रमोटर्सची भागीदारी ९९.९९ टक्के होती, ती आता ७२.९८ टक्क्यांवर गेली आहे.
(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)
संबंधित बातम्या