Kannadiga Reservation : राज्यातील भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला आहे. लवकरच तसा कायदा करण्यात येणार आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयावर उद्योग जगतातून जोरदार टीका होत आहे. किरण शॉ मुजुमदार व मोहनदास पै यांच्यानंतर आता PhonePe चे संस्थापक व सीईओ समीर निगम यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
कर्नाटक सरकारचा हा निर्णय लज्जास्पद आहे, असं समीर निगम यांनी थेट म्हटलं आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. माझी मुलं कर्नाटकमध्ये नोकरी करण्यासाठी लायक नाहीत का, असा प्रश्न त्यांनी तिथल्या सरकारला केला आहे.
‘मी आज ४६ वर्षांचा आहे. मी कोणत्याही एका राज्यात १५ वर्षांपेक्षा जास्त काळ राहिलेलो नाही. माझे वडील भारतीय नौदलात काम करतात. कामानिमित्त त्यांची देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असते. त्यांची मुलं नोकरीसाठी पात्र नाहीत का? मी स्वत: एक कंपनी उभी केली आहे. २५ हजारहून जास्त लोकांना रोजगार दिला आहे. माझी मुलं त्यांच्या शहरात नोकरी करण्यासाठी लायक नाहीत का,’ अशी विचारणा त्यांनी केली आहे.
कर्नाटक मंत्रिमंडळानं कन्नडिगा किंवा स्थानिक रहिवाशांना खासगी उद्योगांमध्ये C आणि D श्रेणीच्या पदांसाठी १०० टक्के आरक्षण अनिवार्य करणारे विधेयक मंजूर केलं आहे. नॅसकॉमनं या विधेयकावर चिंता व्यक्त केली आहे. यामुळं उद्योगाच्या वाढीला बाधा येईल, नोकऱ्यांवर परिणाम होईल आणि कंपन्यांना राज्यातून इतरत्र स्थलांतर करणं भाग पडेल, असं 'नॅसकॉम'नं म्हटलं आहे.
बायकॉनच्या प्रमुख किरण मुजुमदार शॉ आणि इन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पै यांनीही या विधेयकावर टीका केली आहे. कुशल कर्मचाऱ्यांची भरती या कायद्यातून वगळावी, अशी मागणी शॉ यांनी केली आहे. तर हे विधेयक फॅसिस्ट, घटनाविरोधी आणि भेदभाव वाढवणारं आहे. ते तात्काळ रद्द झालं पाहिजे, असं मोहनदास पै यांनी म्हटलं आहे.
उद्योग वर्तुळातून झालेल्या जोरदार टीकेनंतर कर्नाटक सरकारनं हे विधेयक तात्पुरतं स्थगित केलं आहे. येत्या काही दिवसांत त्यावर फेरविचार करण्यात येईल आणि पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर पुन्हा निर्णय होईल, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या सोशल पोस्टमध्ये म्हटलं आहे.
संबंधित बातम्या