Stock Split News : कामधेनू लिमिटेडच्या शेअरहोल्डर्ससाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या डीमॅट खात्यात या कंपनीचे शेअर्स थेट दहा पटीनं वाढणार आहेत. कारण, या कंपनीनं एका शेअरचे १० भागांत विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. ही तारीख नव्या वर्षात आहे.
कामधेनू लिमिटेडनं स्टॉक एक्स्चेंजला १० जानेवारीआधी या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार १० रुपये अंकित मूल्य असलेल्या कंपनीच्या शेअरची थेट १० भागांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या विभाजनानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपयापर्यंत खाली येईल. त्यासाठी बुधवार, ८ जानेवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीनं गुरुवारी दिली. तुम्हाला या शेअर स्प्लिटचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला कंपनीचे शेअर्स रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधी खरेदी करावे लागतील.
गेल्या दोन वर्षांपासून कामधेनू लिमिटेड सातत्यानं गुंतवणूकदारांना लाभांश देत आहे. कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना २०२३ मध्ये प्रति शेअर १.५० रुपये आणि २०२४ मध्ये प्रति शेअर २ रुपये लाभांश दिला.
गेल्या तीन महिन्यांत कामधेनू लिमिटेडचा शेअर २० टक्क्यांनी घसरला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी ६ महिन्यांपूर्वी हा शेअर खरेदी आणि ठेवला होता, त्यांचं आतापर्यंत ६ टक्क्यांहून अधिक नुकसान झालं आहे. तरीही पोझिशनल गुंतवणूकदारांनी वर्षभरात ८० टक्के वाढ केली आहे. या काळात सेन्सेक्स १६.८८ टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६७२.१५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २६५.८० रुपये आहे.
गेल्या ५ वर्षात कामधेनू लिमिटेडच्या शेअर्समध्ये ११४७.९९ टक्क्यांची वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीत प्रवर्तकांचे शेअरहोल्डिंग घटलं आहे. जून २०२४ पर्यंत प्रवर्तकांचा कंपनीत ५७.०४ टक्के हिस्सा होता. सप्टेंबर तिमाहीपर्यंत तो ४९.८३ टक्क्यांवर आला आहे.
संबंधित बातम्या