Stock Market News : कल्याण ज्वेलर्स इंडियाचा शेअर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घसरत असून ही घसरण आज ८व्या दिवशीही कायम राहिली. दिवसभरातील व्यवहारात हा शेअर १० टक्क्यांहून अधिक घसरून ५२२.७५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. तर, दिवसअखेर ७.७८ टक्क्यांनी घसरून ५५० रुपयांवर बंद झाला.
कल्याण ज्वेलर्सचं बाजारमूल्य गेल्या दोन वर्षांत दुपटीनं वाढलं आहे. कॅलेंडर वर्ष २०२४ (आर्थिक वर्ष २०२४) मध्ये त्यात ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये हा शेअर १८० टक्क्यांनी वधारला. त्या तुलनेत बीएसई सेन्सेक्स कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये २० टक्के आणि कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये ९ टक्क्यांनी वधारला.
डिसेंबर २०२४ तिमाहीतील कल्याण ज्वेलर्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नच्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी कंपनीतील आपला हिस्सा सुमारे १ टक्क्यांनी कमी करून १५.७५ टक्के केला आहे. सप्टेंबर तिमाहीअखेर त्यांच्याकडं कंपनीत १६.३७ टक्के हिस्सा होता. कंपनीतील निवासी वैयक्तिक भागधारकांचा हिस्सा ६.०८ टक्क्यांवरून ६.४७ टक्क्यांवर पोहोचला आहे.
चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत कल्याण ज्वेलर्सच्या महसुलात ३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सणासुदीची आणि लग्नसराईची मागणी वाढल्यानं याला चालना मिळाली. गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) कंपनीचा महसूल ५,२२३.०७ कोटी रुपये होता. कल्याण ज्वेलर्सच्या भारतातील कामकाजातील महसुली वाढ आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ४१ टक्के आणि पश्चिम आशियात २२ टक्के होती.
केरळ राज्यातील त्रिशूर इथं मुख्यालय असलेला कल्याण ज्वेलर्स हा भारतातील दागिन्यांच्या सर्वात मोठ्या किरकोळ विक्रेत्यांपैकी एक आहे. कल्याण ज्वेलर्सचे ३०३ शोरूम असून ते भारत आणि मध्यपूर्वेत पसरलेले आहेत. त्यांचे किरकोळ क्षेत्रफळ ८,३६,००० चौरस फुटांहून अधिक आहे.
संबंधित बातम्या