मराठी बातम्या  /  बिझनेस  /  kalyan Jewellers : कल्याण ज्वेलर्सच्या शेअरनं गाठला नवा उच्चांक, तुमच्याकडं आहे का?

kalyan Jewellers : कल्याण ज्वेलर्सच्या शेअरनं गाठला नवा उच्चांक, तुमच्याकडं आहे का?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 05, 2024 11:31 AM IST

Kalyan Jewellers Share Price : कल्याण ज्वेलर्स इंडियानं चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत दणदणीत महसूल मिळवला असून त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत.

Kalyan Jewellers
Kalyan Jewellers (REUTERS)

Kalyan Jewellers Share Price : भारतातील सर्वात मोठ्या ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्स इंडियाचा शेअर आज सुरुवातीच्या सत्रात ४.४० टक्क्यांनी वधारून ३७९.७५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत वाढलेल्या व्यवसायाचा हा परिणाम मानला जात आहे.

कल्याण ज्वेलर्सनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीनं भारत आणि मध्य पूर्वेतील सर्व बाजारपेठांमध्ये व्यवसाय वृद्धी आणि महसुलाच्या बाबतीत जोरदार कामगिरी नोंदविली आहे. सोन्याच्या भावातील कमालीची अस्थिरता, श्राद्धाचा लांबलेला महिना आणि तामिळनाडूच्या काही भागात अचानक आलेला पूर अशा सर्व अडचणींवर मात करत ही सकारात्मक कामगिरी केल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

Bajaj Electric Scooter: बाजारात येतेय बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर; ओला आणि एथरला कंपनीला देणार टक्कर!

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीनं ३३ टक्के एकत्रित महसुली वाढ साध्य केली आहे. या तिमाहीत कल्याण ज्वेलर्सनं भारतात २२ नवीन शोरूम सुरू केले आहेत. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये आणखी ८० शोरूमसाठी एलओआयवर स्वाक्षरी झाली आहे. त्यापैकी बहुतेक सुधारित फ्रँचायझी मॉडेलअंतर्गत स्थापित केले जाणार आहेत.

३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कंपनीचे भारत आणि मध्य पूर्वेत एकूण २३५ शोरूम आहेत. येणाऱ्या तिमाहीत भारतात १५, मध्यपूर्वेत २ आणि अतिरिक्त १३ 'कॅन्डेअर' शोरूम सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

कसा आहे शेअरचा प्रवास?

गेल्या वर्षभरात कल्याण ज्वेलर्सचा शेअर १२३ रुपयांवरून ३६३ रुपयांवर पोहोचला असून १९५ टक्के मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. २६ मार्च २०२१ रोजी शेअर्स ८७ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत ७५.३ रुपयांवर लिस्ट झाले होते. सध्याच्या हा शेअर आयपीओच्या किमतीपेक्षा ३१७ टक्क्यांनी अधिक किंमतीवर ट्रेड करत आहे.

Jio Prepaid Plan: जिओचा १४८ रुपयांचा धमाकेदार प्लॉन; १२ ओटीटी प्लेटफॉर्मसह भरमसाठ डेटा मिळणार!

आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीनं ४,४१५ कोटी रुपयांचा एकत्रित महसूल नोंदवला आहे, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीतील ३४७३ कोटी रुपयांच्या तुलनेत २७.१२ टक्क्यांनी जास्त आहे.

तिमाहीसाठी एकत्रित करोत्तर नफा (Profit After Tax) १३५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षाच्या याच कालावधीतील १०६ कोटी रुपयांच्या करोत्तर नफ्यापेक्षा २७.३५ टक्के अधिक आहे. 

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग