First IPO of New Year 2024 : नव्या वर्षात शेअर बाजारातील गुंतवणुकीला सुरुवात करणार असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. यंदाच्या वर्षातील पहिला आयपीओ लवकरच खुला होणार आहे.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही कंपनी आपला आयपीओ आणत आहे. येत्या ९ जानेवारी २०२४ रोजी हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल आणि ११ जानेवारीपर्यंत खुला राहील. या आयपीओसाठी ३१५ ते ३३१ रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. हा संपूर्णपणे फ्रेश इश्यू असून त्या माध्यमातून १,००० कोटी रुपये उभारण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.
ज्योती सीएनसी ऑटोमेशनचा आयपीओ अद्याप सबस्क्रिप्शनसाठी खुला झालेला नाही. मात्र, त्याआधीच ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स ६० रुपयांच्या प्रीमियमवर पोहोचले आहेत. आयपीओमधील शेअरचं वाटप १२ जानेवारी २०२४ रोजी होईल. तर, कंपनीचे शेअर्स १६ जानेवारी २०२४ रोजी बाजारात सूचीबद्ध केले जातील. ज्योती सीएनसी ऑटोमेशनचे शेअर्स मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) सूचीबद्ध होणार आहेत. कंपनीमध्ये सध्या प्रवर्तकांची भागीदारी ७२.६६ टक्के इतकी आहे.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेडची स्थापना १९९१ मध्ये झाली. ही कंपनी सीएनसी मशीनची निर्मिती आणि पुरवठा करते. सीएनसी मशीनच्या उत्पादनात ही कंपनी आघाडीवर आहे. कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये सीएनसी टर्निंग सेंटर्स, सीएनसी टर्निंग-मिलिंग सेंटर्स, सीएनसी व्हर्टिकल मशीनिंग सेंटर्स, सीएनसी हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटर्स समाविष्ट आहेत. कंपनीच्या ग्राहकांमध्ये इस्रो, तुर्की एरोस्पेस, युनिपार्ट्स इंडिया, टाटा अॅडव्हान्सेस सिस्टिम्स, भारत फोर्ज, शक्ती पम्प्स (इंडिया), श्रीराम एअरोस्पेस अँड डिफेन्स, रोलेक्स रिंग्स, हर्षा इंजिनीअर्स, बॉश लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. ३० जून २०२३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, कंपनी वर्षाला ४४०० मशीनची निर्मिती करते. तर, कंपनीच्या फ्रान्समधील युनिटमध्ये वर्षाला १२१ मशीन्स बनवल्या जातात.