
Layoffs : मंदीच्या भीतीमुळे टेक कंपन्यांनी आधीच अनेक कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. अमेरिकेतील अनेक क्षेत्रांनाही याचा फटका बसला आहे. अमेरिकन बँकिंग क्षेत्रावर गंभीर संकट कोसळले आहे. दरम्यान, अमेरिकेतील सर्वात मोठ्या कर्जदार जेपी मॉर्गन चेसने ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची तयारी केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, जेपी मॉर्गनचे अनेक विभाग बंद केले जाणार आहेत, ज्यात ग्राहक बँकिंग, व्यावसायिक बँकिंग, मालमत्ता आणि संपत्ती व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान क्षेत्रांचा समावेश आहे. बँकेने कामकाज आणि बाजाराच्या परिस्थितीनुसार कपातीचा निर्णय घेतला जाणार आहे.
पहिल्या तिमाहीच्या शेवटी, जेपी मॉर्गनच्या कर्मचाऱ्यांची संख्या एकूण २९६,८७७ च्या घरात होती. मागील वर्षाच्या तुलनेत ती ८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
अहवालानुसार, सध्याच्या कर्मचारी कपातीनंतरही कंपनीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करत आहेत. या बँकेत सध्या १३ हजारांहून अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. दरम्यान, या नोकर कपातीसंदर्भात अधिक वक्तव्य करण्यास जेपी मॉर्गनने टाळाटाळ केली आहे.
दुसर्या अहवालात असे म्हटले आहे की, जेपी मॉर्गन फर्स्ट रिपब्लिक बँकेचे कर्मचारी देखील कमी करत आहेत. जेपी मॉर्गनने फर्स्ट रिपब्लिक बँक अयशस्वी झाल्यानंतर त्याचे अधिग्रहण केले होते. फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या सुमारे १ हजार कर्मचाऱ्यांना या टाळेबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
