Multibagger share news : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजीची लाट आहे. तेजीच्या या लाटेचा फायदा अनेक कंपन्यांच्या शेअरला झाला आहे. जॉन कॉकेरिल इंडिया लिमिटेडचा शेअर त्यापैकीच एक आहे. या शेअरनं मागच्या अवघ्या १३ दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
जॉन कॉकेरिल इंडिया लिमिटेडच्या शेअरमध्ये आज १८ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. या मल्टीबॅगर शेअरची किंमत ५४६२.६० रुपयांच्या पातळीवर उघडली. दिवसभरात कंपनीनं ६४४३ रुपयांचा उच्चांक गाठला. कंपनीचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. गेल्या दोन दिवसांत शेअरचा भाव ४२ टक्क्यांहून अधिक वधारला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, ५ जून रोजी कंपनीच्या शेअरची किंमत ३२५० रुपयांच्या पातळीवर होती. त्यानंतरच्या १३ दिवसांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ९८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले आहेत.
जॉन कॉकेरिल इंडियानं मे महिन्यात पात्र गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर केला होता. प्रति शेअर ७ रुपये लाभांश देण्यात आला. कंपनीनं ६ ऑगस्ट २००१ रोजी पहिल्यांदा एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता. तेव्हा कंपनीनं शेअरमागे २ रुपये लाभांश दिला होता. त्यानंतर ६ वर्षांनंतर कंपनीनं ९ रुपयांचा लाभांश दिला. त्यानंतर २०१२ पर्यंत कंपनीनं सातत्याने लाभांश दिला होता.
गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ९० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी किमान एक वर्ष या कंपनीचे शेअर घेऊन ठेवले होते, त्यांना १२० टक्के नफा झाला आहे. म्हणजेच या काळात पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. जॉन कॉकेरिल इंडिया लिमिटेडचं मार्केट कॅप २९६५.७५ कोटी रुपये आहे.
कंपनीत प्रवर्तकांचा ७५ टक्के हिस्सा आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा वाटा २४.९१ टक्के आहे. डिसेंबर तिमाहीत परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा नव्हता. परंतु मार्च तिमाहीत तो ०.०२ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
(डिस्क्लेमर: वरील वृत्त हे केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)
संबंधित बातम्या