मराठी बातम्या  /  बिझनेस  /  JM Financial Share Crash : आरबीआयच्या एका निर्णयामुळं दरडीसारखा कोसळला शेअर, ७७ रुपयांवर आला भाव

JM Financial Share Crash : आरबीआयच्या एका निर्णयामुळं दरडीसारखा कोसळला शेअर, ७७ रुपयांवर आला भाव

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 06, 2024 01:06 PM IST

Share Market News : आरबीआयनं घातलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर जेएम फायनान्शियल या कंपनीचा शेअर तब्बल २० टक्क्यांनी गडगडला आहे.

आरबीआयच्या एका निर्णयामुळं दरडीसारखा कोसळला शेअर, आता काय करायचं?
आरबीआयच्या एका निर्णयामुळं दरडीसारखा कोसळला शेअर, आता काय करायचं?

JM Financial Share price : जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या ​​शेअर्सची आज सगळीकडं चर्चा आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. जेएम फायनान्शियलचे शेअर्स बीएसईवर (BSE) जवळपास २० टक्क्यांनी घसरून ७७.१० रुपयांवर पोहोचले आहेत. आरबीआयच्या एका निर्णयामुळं ही घसरण झाली आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) जेएम फायनान्शियल प्रॉडक्ट्स लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. या कंपनीच्या शेअर्स आणि डिबेंचर्सच्या बदल्यात कोणत्याही प्रकारच्या अर्थ पुरवठ्यावर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे. यात प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) वर कर्ज मंजुरी आणि वितरणाचा देखील समावेश आहे.

आयपीओ फायनान्सिंगसह नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (एनसीडी) खरेदीसाठी कंपनीनं मंजूर केलेल्या कर्जांमध्ये काही गंभीर त्रुटी लक्षात आल्यानंतर हे पाऊल आवश्यक होतं, असं आरबीआयनं कारवाईबद्दल म्हटलं आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे RBI नं कंपनीच्या वहीखात्याचा आढावा घेतला होता. जेएम फायनान्शियलचं विशेष ऑडिट पूर्ण झाल्यानंतर आणि त्रुटी दूर समाधानकारक पावलं उचलली जात असल्याची खात्री झाल्यानंतर व्यावसायिक निर्बंधांचा फेरआढावा घेतला जाईल, असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.

कारवाईचा बडगा उगारतानाच आरबीआयनं जेएम फायनान्शियलला काही सवलती दिल्या आहेत. त्यात सर्वसाधारण कलेक्शन आणि वसुलीसारखे सध्याच्या कर्ज खात्याशी संंबंधित व्यवहार चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कंपनीच्या शेअरची कशी आहे अवस्था?

मागील पाच दिवसांत जेएम फायनान्शियलचा शेअर जवळपास २० टक्क्यांनी घसरला आहे. तर, एका महिन्यात शेअर २८.३१ टक्क्यांनी घसरला आहे. या वर्षी आतापर्यंत हा शेअर २१ टक्क्यांनी वाढला आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ११४.९५ रुपये आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ५७.३८ रुपये आहे. कंपनीची मार्केट कॅप ७५७४.८३ कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग