JioPhone Prima 2 : भारतीय दूरसंचार क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिलायन्स जिओनं आता क्वालकॉम स्नॅपड्रॅगन-संचालित फीचर फोन लाँच केला आहे. जिओफोन प्राइमा २ असं त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. डिझाइन व लूकच्या बाबतीत आगळावेगळा असलेला हा फोन युजर्सना आकर्षित करणारा आहे.
४ जी श्रेणीमध्ये ग्राहकांना अधिकाधिक स्वस्त पर्याय देण्याच्या उद्देशानं हा फोन लाँच करण्यात आला आहे. मागील वर्षी बाजारात आलेल्या जिओ प्राइमा ४ या फोनचा हा अद्ययावत अवतार आहे. जिओ प्राइमा २ मध्ये देखील जिओ अॅप्सचा अॅक्सेस मिळणार आहे. त्याशिवाय, या फोनद्वारे यूपीआय पेमेंटही करता येणार आहे.
जिओ प्राइमा २ मध्ये ३२० x २४० पिक्सल रिझोल्यूशनसह २.४ इंचाचा क्यूव्हीजीए कर्व्ड डिस्प्ले आहे. यात क्वॉलकॉम चिपसेट देण्यात आला आहे. ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. यात व्हिडिओ कॉलिंगची सुविधा असून युजर्सना कोणत्याही वेगळ्या अॅपच्या मदतीशिवाय समोरासमोर कनेक्ट करता येईल.
नवीन जिओ पाइमा २ हा फोन काई ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. यात युजर्सना यूट्यूब, फेसबुक आणि गुगल असिस्टंट सारखे अनेक महत्त्वाचे अॅप्स वापरता येणार आहेत. शिवाय जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सावन यांसारखे जिओ अॅप्सही या स्मार्टफोनवर चालतात. सर्वसामान्यांच्या खिशाला सहज परवडू शकणाऱ्या या बजेट फोनमध्ये ०.३ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि इमर्जन्सी फोटो काढण्यासाठी रिअर सेन्सरही देण्यात आला आहे.
फीचर फोनमध्ये जिओपे अॅपद्वारे यूपीआयचा वापर करून पेमेंट करण्यासाठी सपोर्ट देखील मिळतो. या फोनला २००० एमएएचची मोठी बॅटरी सपोर्ट करते. प्राइमा २ ची जाडी १५.१ मिमी आहे आणि वजन सुमारे १२० ग्रॅम आहे. यात ३.५ एमएम हेडफोन आणि एफएम रेडिओचा सपोर्ट देण्यात आला आहे.
हा फोन एकमेव लक्स ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून मागील बाजूस लेदरफिनिश आहे. प्राइमा २ ची किंमत २,७९९ रुपये असून अॅमेझॉन, जिओमार्ट, रिलायन्स डिजिटलसह रिटेल आउटलेटवरून खरेदी करता येईल.