रिलायन्सच्या मालकीच्या जिओ प्लॅटफॉर्म्सने (जेपीएल) प्रसिद्ध अमेरिकी उद्योजक एलन मस्क यांच्या मालकीच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीसोबत भागीदारी केली असून भारतातील ग्राहकांना स्टारलिंकची हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देणार आहे. जिओचे भारतातील विस्तृत मोबाइल नेटवर्कचे जाळे असून अमेरिकी कंपनीच्या स्टारलिंक उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहकार्याने भारतात ग्रामीण भागात अविरत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचा जिओचा प्रयत्न असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. दरम्यान, हा करार सध्या सरकारकडे विचाराधीन आहे. विशेष म्हणजे भारतात हायस्पीड सॅटेलाईट इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्टारलिंकच्या स्पेसएक्स कंपनीने भारती एअरटेल कंपनीसोबत ११ मार्च रोजी करार झाल्याचे जाहीर केले आहे.
डेटा ट्रॅफिक बाबत जिओ ही जगातील सर्वात मोठी मोबाइल ऑपरेटर म्हणून ओळखली जाते. तर स्टारलिंक इंटरनेट हे जगातील अग्रगण्य असे 'लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट कॉन्स्टेलेशन ऑपरेटर' म्हणून ओळखले जाते. भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागात इंटरनेट सेवा पोहोचविण्याची याचा फायदा होणार असून जिओ आपल्या रिटेल आउटलेट्स आणि ऑनलाइन स्टोअर्सवर सॅटेलाइट इंटरनेट सोल्युशन्स उपलब्ध करून देणार असल्याचे जिओने म्हटले आहे.
स्टारलिंक नेटवर्क हे जगातील पहिले आणि सर्वात मोठे सॅटेलाईट इंटरनेट प्रोव्हायडर आहे. यात ग्राहकांना ब्रॉडबँड (वाय-फाय) इंटरनेट देण्यासाठी पृथ्वीच्या खालच्या कक्षेचा वापर केला जातो. लोक त्यांच्या स्टारलिंक उपकरणांद्वारे उपग्रह नेटवर्कमध्ये टॅप करून स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ कॉलिंग इत्यादींसाठी याचा वापर करू शकतात. अमेरिकेतील उद्योगपती एलन मस्क यांच्या मालकीची स्पेसएक्स ही कंपनी स्टारलिंकच्या जगभरातील क्रियान्वयनाचे नियंत्रण करते. तथापि, भारतात स्टारलिंक सेवेची अंतिम लाँचिंग दूरसंचार प्राधिकरणांच्या आवश्यक नियामक मंजुरीवर अवलंबून असणार आहे.
एअरटेल ही कंपनी भारतात स्टारलिंकच्या इंटरनेट सेवेची विक्री करणार असल्याचा करार झाल्याची माहिती भारती एअरटेलने ११ मार्च रोजी बीएसईवर दिलेल्या एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. या करारामुळे स्टारलिंकचे मालक कंपनी असलेल्या स्पेसएक्सला भारतात स्टारलिंक इंटरनेट विकण्याचा अधिकार मिळाला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यावसायिक ग्राहक, समुदाय, शाळा आणि आरोग्य केंद्रांना जोडण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
संबंधित बातम्या