Jio launches JioBharat V3 and V4: भारतीय टेलिकॉम कंपनी जिओने इंडियन मोबाइल काँग्रेस (आयएमसी) २०२४ मध्ये आपले नवीन दोन 4G फीचर फोन भारतात लॉन्च केल्या. जिओभारत व्ही ३ आणि जिओभारत व्ही ४ अशी या दोन्ही फोनची नावे आहेत. डिजिटल दर कमी करण्याच्या उद्देशाने हे फोन 2G वापरकर्त्यांना परवडणारी 4G कनेक्टिव्हिटी आणण्याचे आश्वासन देतात, असे कंपनीने म्हटले आहे.
या फोनची किंमत १ हजार ९९ रुपयांपासून सुरू होते. लवकरच जिओभारत व्ही ३ आणि जिओभारत व्ही ४ अॅमेझॉन, जिओमार्टसारख्या प्लॅटफॉर्मवर आणि निवडक ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असतील. हे फोन दरमहा १२३ रुपयांपासून सुरू होणारा एक्सक्लुझिव्ह प्रीपेड रिचार्ज प्लान ऑफर करतात, ज्यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि १४ जीबी डेटाचा समावेश आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये १००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून १२८ जीबीपर्यंत एक्सपेंडेबल स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनमध्ये २३ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला.
फोनमध्ये तुम्हाला जिओ टीव्हीचा अॅक्सेस मिळेल. यामध्ये तुम्हाला 455 हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनल्स पाहता येणार आहेत. याशिवाय कंपनी या फोनमध्ये जिओ सिनेमादेखील ऑफर करत आहे जेणेकरून युजर्स आपला आवडता चित्रपट फोनमध्ये पाहू शकतील. या फोनमध्ये तुम्हाला व्हिडिओ आणि स्पोर्ट्स कंटेंटही एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे. इतकंच नाही तर कंपनी या फोनमध्ये इन-बिल्ट साउंड-बॉक्ससह यूपीआय इंटिग्रेशनसह जिओपे सेवा देखील देत आहे. यामुळे युजर्सला डिजिटल पेमेंट सहज करता येणार आहे. फोनमध्ये जिओ चॅट सेवाही देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस मेसेजिंग, फोटो शेअर आणि ग्रुप चॅट सारखे पर्याय मिळतील.
रिलायन्स जिओचे चेअरमन म्हणाले की, ‘मोदींच्या भारतात पहिल्यासारखा व्यवसाय राहिलेला नाही. दरम्यान, १.४५ अब्ज भारतीयांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जागतिक दर्जाच्या सेवा देण्यासाठी सरकार आणि उद्योग यांच्यात असामान्य समन्वय आहे. तरुण भारताचा प्रतिनिधी या नात्याने मी तरुणांशी असलेल्या अविश्वसनीय संबंधाबद्दल आणि अशक्य वाटणाऱ्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो.’ मोबाइल ब्रॉडबँडबाबत भारत जगातील सर्वात मोठी डेटा बाजारपेठ बनली आहे, अशी ग्वाहीही त्यांनी पंतप्रधानांना दिली.
संबंधित बातम्या