Q3 Results : रिलायन्स इंडस्ट्रीज पाठोपाठ आता मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. मागील वर्षीच्या तिमाहीशी तुलना करता या तिमाहीत कंपनीचा नफा अवघा १ कोटी रुपयांनी वाढला आहे. मात्र, कंपनीच्या शेअरच्या वाटचालीवर तज्ञ आशावादी आहेत. हा शेअर पुन्हा एकदा ३०० रुपयांची पातळी ओलांडेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न ४४९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ४१४ कोटी रुपये होतं. एकूण खर्चातही वार्षिक आधारावर वाढ झाली आहे. हा खर्च गेल्या वर्षी याच तिमाहीत ९९ कोटी रुपये होता, तो १३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा तिमाही नफा अवघ्या १ कोटी रुपयांनी वाढून २९५ कोटी झाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तो २९४ कोटी रुपये होता. तर, डिसेंबरअखेर संपलेल्या नऊ महिन्यांत कंपनीचा निव्वळ नफा १,२९४ कोटी रुपयांवरून १,२९६ कोटींवर पोहोचला आहे, म्हणजेच त्यात २ कोटींची वाढ झाली आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर शुक्रवारी ०.७० टक्क्यांनी वधारून २७८.७५ रुपयांवर बंद झाला. व्यवहारादरम्यान हा शेअर २७५.७० रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. एप्रिल २०२४ मध्ये हा शेअर ३९४.७० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. मागच्या एका वर्षात शेअर १५ टक्क्यांनी वाढला आहे. तर, २०२३ च्या ऑगस्ट महिन्यात सूचीबद्ध झाल्यापासून कंपनीनं गुंतवणूकदारांना सुमारे ३० टक्के परतावा दिला आहे.
केआर चोक्सी फिनसर्व्हनं जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरसाठी ३४५ रुपयांचं टार्गेट प्राइस निश्चित केलं आहे. ब्रोकरेजनं या शेअरला 'होल्ड' रेटिंग दिलं आहे.
जेएम फायनान्शियलच्या अहवालानुसार, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा निफ्टी ५० मध्ये समावेश होऊ शकतो. फेब्रुवारी २०२५ मध्ये ही घोषणा होणार असून ३१ मार्च २०२५ पासून ती लागू होणार आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा निफ्टी ५० मध्ये समावेश झाल्यास मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसला ३५.६ कोटी डॉलरची गुंतवणूक मिळू शकते, असा अंदाज आहे. जिओ फायनान्शिअलव्यतिरिक्त झोमॅटोही निफ्टी ५० मध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या