share market updates : प्रीमियर एनर्जीज बरोबरच आज जे बी लॅमिनेशन्सच्या आयपीओचंही जोरदार लिस्टिंग झालं. एनएसई एसएमईमध्ये कंपनीचा शेअर ९० टक्क्यांच्या प्रीमियमवर २७७.४० रुपयांवर सूचीबद्ध झाला आहे. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
लिस्टिंगनंतर जे बी लॅमिनेशन्सचा शेअर वाढत गेला आणि पहिल्याच दिवशी शेअरला अपर सर्किट लागलं. अप्पर सर्किटनंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत २९१.९५ रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे.
जे बी लॅमिनेशनचा आयपीओ २७ ऑगस्ट रोजी खुला झाला होता. गुंतवणूकदारांना २९ ऑगस्टपर्यंत सब्सक्रिप्शनची संधी होती. आयपीओसाठी १३८ ते १४६ रुपयांचा दरपट्टा निश्चित करण्यात आला होता. ग्रे मार्केटमध्ये आयपीओची कामगिरी चांगली होती. त्यामुळं या शेअरची लिस्टिंग जोरदार होईल असा अंदाज बांधला जात होता. तो खरा ठरला आहे. ज्यांना हा आयपीओ लागला आहे, त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
जे बी लॅमिनेशन्सनं आयपीओसाठी १००० शेअर्सचा लॉट ठेवला होता. त्यामुळं गुंतवणूकदारांना किमान १ लाख ४६ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागली. हा आयपीओ ३ दिवसांत १३७ पट जास्त सबस्क्राइब आला होता. शेवटच्या दिवशी आयपीओला सर्वाधिक ११३.९५ पट सब्सक्रिप्शन मिळालं.
कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून अँकर गुंतवणूकदारांकडून २४.९७ कोटी रुपये उभे केले आहेत. अँकर गुंतवणूकदारांनी २६ ऑगस्ट २०२४ रोजी बोली लावली होती. आयपीओचं मार्केट कॅप ६५७.२८ कोटी रुपये आहे.
या आयपीओचा आकार ८८.९६ कोटी रुपये होता. कंपनीनं ४५.७० लाख नवीन शेअर्स विक्रीस काढले होते. तर, ऑफर फॉर सेल अंतर्गत १५.२३ लाख शेअर्स जारी करण्यात आले होते. मुनीष कुमार अग्रवाल, मुदित अग्रवाल आणि सुनीता अग्रवाल हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओ येण्याआधी त्यांच्याकडं कंपनीत ९७ टक्के हिस्सा होता.