ITR news : तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स रिटर्न अजूनही फाइल केलं नसेल तर लवकरात लवकर भरा. कारण, आयटीआर फायलिंगची शेवटची तारीख वाढवली जाणार नसल्याचे संकेत प्राप्तिकर विभागानं दिले आहेत. आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४ आहे.
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख दरवर्षी ३१ जुलै ही असते. अपवादात्मक परिस्थितीत ही तारीख वाढवली जाते. यंदा अनेक करदात्यांना ई-फायलिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तशा तक्रारीही केल्या जात आहेत. मात्र, तरीही यंदा इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगची शेवटची तारीख वाढवली जाणं शक्य नसल्याचं समजतं.
प्राप्तिकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलैपर्यंत ४ कोटी लोकांनी आयटीआर दाखल केले होते. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत तुलनेनं कमी लोकांनी आयटीआर भरला होता. गेल्या वर्षी हा आकडा गाठण्यासाठी २४ जुलै उजाडावा लागला होता. त्यामानाने यंदा आयटीआर फायलिंगचा वेग चांगला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक लोक आयटीआर भरतील, अशी आशा प्राप्तिकर विभागानं व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी जुलै अखेरपर्यंत एकूण ६.७७ कोटी लोकांनी आयटीआर भरले होते.
टॅक्सपेयर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशननं ई-फायलिंग पोर्टलमध्ये त्रुटी असल्याची तक्रार केली होती. त्यावर विभागानं प्रतिसाद दिला आहे. तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. या अडचणी सोडवण्यासाठी प्राप्तिकर विभाग सीबीडीटी इन्फोसिस, आयबीएम आणि हिटाची यांच्या सतत संपर्कात आहे. सेवा पुरवठादारांशी आमचा सतत संवाद साधत आहेत. ई रिटर्न फायलिंगची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जे काही करात येईल ते केलं जात आहे, असं सीबीडीटीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.
३१ जुलै ही वैयक्तिक रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत आयटीआर न भरल्यास दंडासह ३१ डिसेंबरपर्यंत दंड जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. आयटीआर भरण्यासाठी विभागाकडून सातत्यानं लोकांना प्रोत्साहन दिलं जात आहे.
संबंधित बातम्या