ITR Filing News in Marathi : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (CBDT) कर निर्धारण वर्ष २०२४-२५ साठी उशिरा किंवा सुधारित आयकर विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर केली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत असलेली ही मुदत १५ जानेवारी २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळं आयटीआर भरण्याची मूळ देय तारीख चुकलेल्या किंवा सुधारीत रिटर्नमध्ये भरू इच्छिणाऱ्या करदात्यांना याचा फायदा होणार आहे. त्यांना दोन आठवड्यांचा कालावधी अतिरिक्त मिळणार आहे.
वैयक्तिक करदात्यांना आर्थिक वर्ष २०२३-२०२४ (Assesment Year 2024-25) साठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत होती. त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत शुल्क भरून रिटर्न फाइल करण्याची मुभा होती. थकीत परताव्याची रक्कम पाच लाखरुपयांपेक्षा कमी असल्यास करदात्याला १ हजार रुपये आणि कर विवरणपत्राचे मूल्य पाच लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास ५ हजार रुपये शुल्क भरावं लागणार होतं. आता या मुदतीत वाढ करत ती १५ जानेवारी २०२५ करण्यात आली आहे.
उत्पन्नाचं विवरणपत्र भरताना अनेकदा करदात्यांकडून चुका होतात किंवा एखादी महत्त्वाची माहिती त्यात समाविष्ट करण्याचं राहून जातं. अशा परिस्थितीत सुधारित आयटीआर सादर करता येते.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी १७ डिसेंबर रोजी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतातील केवळ ६.६८ टक्के लोकांनी आयकर विवरणपत्र भरलं आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी ६.६८ टक्के आहे. म्हणजेच, या आर्थिक वर्षात प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या ८,०९,०३,३१५ इतकी आहे, अशी माहिती चौधरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
संबंधित बातम्या