Stock Market : शेअर बाजार धडाधड कोसळत असताना सरकारी टेलिकॉम कंपनीच्या शेअरनं कमालच केली!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market : शेअर बाजार धडाधड कोसळत असताना सरकारी टेलिकॉम कंपनीच्या शेअरनं कमालच केली!

Stock Market : शेअर बाजार धडाधड कोसळत असताना सरकारी टेलिकॉम कंपनीच्या शेअरनं कमालच केली!

Jan 06, 2025 12:04 PM IST

ITI Ltd Share Price News in Marathi : सरकारी टेलिकॉम कंपनी आयटीआय लिमिटेडच्या शेअरनं आज सार्वकालिक उच्चांक गाठला. विशेष म्हणजे शेअर बाजार कोसळत असताना शेअरनं ही मजल मारली.

Stock Market : शेअर बाजार धडाधड कोसळत असताना 'या' टेलिकॉम कंपनीचा शेअर गगनाला भिडला
Stock Market : शेअर बाजार धडाधड कोसळत असताना 'या' टेलिकॉम कंपनीचा शेअर गगनाला भिडला

Share Market News Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सेन्सेक्स आणि निफ्टी गडगडत असताना दूरसंचार कंपनी ITI लिमिटेडचा शेअर भरारी घेत आहे. हा शेअर तब्बल १६ टक्क्यांहून जास्त वाढला असून शेअरनं ५४४.७० रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला.

आयटीआय लिमिटेडचा शेअर आज सकाळी ४७३.४० रुपयांवर खुला झाला आणि काही वेळातच उसळी घेत ५४४.७० रुपयांवर पोहोचला. सकाळी ११.४५ च्या सुमारास, शेअर १५.७० टक्क्यांनी वाढून ५२८.८५ रुपयांवर व्यवहार करत होता.

गेल्या एका वर्षात, ITI Limited च्या शेअरची किंमत २१० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकावरून आजच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. या वर्षी २०२५ मध्ये आतापर्यंत त्यात सुमारे ३५ टक्के वाढ झाली आहे.

का वाढतोय हा शेअर?

ITI कंपनीचा शेअर वाढण्यामागे कंपनीनं अलीकडंच केलेले अनेक करार आहेत. यात भारत नेटशी संबंधित मोठे प्रकल्प आणि संपूर्ण भारतातील दूरसंचार पायाभूत सुविधा वाढविण्याच्या उद्देशानं हाती घेतलेल्या इतर सरकारी उपक्रमांचा समावेश आहे. या करारांमुळं आयटीआयच्या महसुलात वाढ होईल आणि येत्या तिमाहीत कंपनीचा नफा वाढेल, अशी अपेक्षा आहे.

याशिवाय, आयटीआय लिमिटेडच्या आर्थिक कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. कंपनीची निव्वळ विक्री मागील कालावधीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ३१२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून १०१६.२० कोटीवर पोहोचली आहे. मागील कालावधीच्या तुलनेत त्याचा निव्वळ तोटा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

तांत्रिक चार्टवर कामगिरी कशी आहे?

विश्लेषकांचं म्हणणं आहे की स्टॉक त्याच्या प्रमुख मूव्हिंग ॲव्हरेजच्या (५ दिवस, २०दिवस, ५० दिवस, १०० दिवस आणि २०० दिवस) वर व्यापार करत आहे. ही स्थिती अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही दृष्टीकोनातून तेजी दर्शवते. ITI शेअर्ससाठी अप्पर सर्किट मर्यादा ५४८.५० वर सेट केली आहे, तर लोअर सर्किट ३६५.७९ वर सेट केली आहे.

तज्ञ काय म्हणतात?

आयटीआय लिमिटेडच्या शेअरबाबत मार्केट एक्सपर्ट्स उत्साही आहेत. अनेकांनी त्याच्या शेअरच्या वाढीच्या शक्यतेचा आधार घेत BUY रेटिंगची शिफारस केली आहे. आयटीआयचे मजबूत ऑर्डर बुक आणि चालू असलेले सरकारी प्रकल्प दूरसंचार क्षेत्रातील निरंतर वाढीसाठी योग्य स्थितीत आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner