मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ITC share price : आयटीसीचे शेअर्स तुमच्याकडं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास

ITC share price : आयटीसीचे शेअर्स तुमच्याकडं असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 21, 2024 02:17 PM IST

ITC Share Price : साबण, मैद्यापासून ते सिगारेटपर्यंतच्या व्यवसायात असलेल्या आयटीसी कंपनीच्या शेअरबद्दल मार्केट एक्सपर्ट्नी महत्त्वाची माहिती दिली आहे.

ITC Share price
ITC Share price

ITC Share Price : साबण, मैदा, बिस्किटांपासून ते सिगारेटपर्यंत दैनंदिन वापराच्या अनेक चीजवस्तू बनवणारी कंपनी आयटीसीचे शेअरच्या बाबतीत मार्केट एक्सपर्टं प्रचंड आशावादी आहेत. हा शेअर पुढच्या काही दिवसांत ५०० रुपयांच्या पुढे जाऊ शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. देशातील ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालनं आयटीसीचा शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे.

मोतीलाल ओसवालनं आयटीसीसाठी ५१५ रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. आज सकाळच्या सत्रात आयटीसीचे शेअर्स सुमारे एक टक्क्यांनी वाढून ४०९.८० रुपयांवर व्यवहार करत होते. हा स्टॉक सकाळी ४०७ रुपयांवर उघडला आणि ४१०.०५ रुपयांवर पोहोचला.

आयटीसीच्या गुंतवणूकदारांसाठी चालू कॅलेंडर वर्ष फारसे उत्साहवर्धक नाही. जानेवारीपासून आतापर्यंत ITC नं १३ टक्क्याहून अधिक नकारात्मक परतावा दिला आहे. तर, मागच्या वर्षभरात शेअरमध्ये जेमतेम ६ टक्के वाढ झाली आहे. अर्थात संयमी गुंतवणूकदारांना या शेअरनं भरघोस नफा मिळवून दिला आहे. गेल्या २५ वर्षांत या शेअरनं १६.९४ रुपयांवरून २३१५ टक्क्यांनी झेप घेतली आहे. आयटीसीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४९९.७० रुपये आणि निचांक ३६९.६५ रुपये आहे.

खरेदी करायचा, विकायचा की वाट पाहायची?

फंडामेंटली स्ट्राँग असलेला आयटीसीचा शेअर बाजारातील तज्ञांसाठी तेजीचा स्टॉक आहे. एकूण ३६ विश्लेषकांपैकी १५ विश्लेषकांनी त्यात जोरदार खरेदीचा सल्ला दिला आहे. १७ ब्रोकरेजनी बाय रेटिंग दिलं आहे, तर चार विश्लेषकांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. एकाही विश्लेषकानं आयटीसीचा शेअर विकण्याचा सल्ला दिलेला नाही.

आयटीसीमध्ये कोणाची किती भागीदारी?

आयटीसीमध्ये विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची सर्वाधिक ४३.२६ टक्के भागीदारी आहे. परकीय गुंतवणूकदारांनी सप्टेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत डिसेंबरच्या तिमाहीत भागीदारी कमी केली आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांची भागीदारी ३१.०८ टक्क्यांवरून ३१.२६ टक्के केली आहे. इतरांकडे २५.४८ टक्के हिस्सा आहे. आयटीसीमध्ये प्रवर्तकांची भागीदारी शून्य टक्के आहे.

 

(डिसक्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं व्यक्तिगत आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग