ITC share price : अर्थसंकल्प सादर होताच आयटीसीच्या शेअरनं गाठला नवा उच्चांक; आता पुढं काय?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ITC share price : अर्थसंकल्प सादर होताच आयटीसीच्या शेअरनं गाठला नवा उच्चांक; आता पुढं काय?

ITC share price : अर्थसंकल्प सादर होताच आयटीसीच्या शेअरनं गाठला नवा उच्चांक; आता पुढं काय?

Updated Jul 24, 2024 12:56 PM IST

ITC Share price : अर्थसंकल्प २०२४ मध्ये तंबाखूकरांमध्ये कोणताही बदल न झाल्यामुळं आयटीसीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. तुमच्याकडं आहे का हा शेअर?

अर्थसंकल्प सादर होताच आयटीसीच्या शेअरचा नवा उच्चांक; आता पुढं काय?
अर्थसंकल्प सादर होताच आयटीसीच्या शेअरचा नवा उच्चांक; आता पुढं काय?

ITC Share price : केंद्रीय अर्थसंकल्प जेव्हा-जेव्हा येतो, तेव्हा एक शेअर नेहमीच चर्चेत असतो, तो म्हणजे आयटीसी लिमिटेड. यंदाचा अर्थसंकल्पही त्यास अपवाद नाही. केंद्र सरकारनं काल अर्थसंकल्प मांडल्यापासून आयटीसीच्या शेअर्समध्ये ७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या शेअरच्या भावानं नवा उच्चांक गाठला आहे.

इतर क्षेत्रातील बहुतेक शेअर घसरले असताना आयटीसीचा शेअर वाढण्याचं नेमकं कारण सहज लक्षात येण्यासारखं आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात तंबाखूवरील कर जैसे थे ठेवण्यात आला आहे. त्यामुळं आयटीसीला दिलासा मिळाला आहे.

याआधी फेब्रुवारी २०२३ मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात तंबाखूच्या करात २ टक्के वाढ करण्यात आली होती. यावेळी तसं झालेलं नाही. त्यामुळं आयटीसीला उत्पादनाच्या किमतीत कमीत कमी ठेवून व्हॉल्यूमवर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली आहे. ही एक महत्त्वाची सकारात्मक बाब आहे,' असं जेफरीज इंडियाच्या विश्लेषकांनी म्हटलं आहे.

सिगारेट हा आयटीसीचा प्रमुख व्यवसाय आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीच्या एकूण महसुलात या व्यवसायाचा वाटा ४० टक्के होता. तसंच, व्याज आणि करपूर्व उत्पन्नात हा वाटा अंदाजे ८० टक्के होता.

'जेफरीज'चा खरेदीचा सल्ला

ब्रोकरेज हाऊस जेफरीजनं आयटीसीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीसाठी जेफरीजनं आयटीसीचं रेटिंग अपग्रेड केलं आहे. यापूर्वी ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्सना होल्ड रेटिंग दिलं होतं. आता जेफरीजनं आयटीसी शेअर्सची टार्गेट प्राइस ५८५ रुपयांपर्यंत वाढवली आहे. याआधी जेफरीजनं आयटीसी शेअर्ससाठी ४३५ रुपयांचं लक्ष्य ठेवलं होतं. ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीनंही आयटीसी शेअर्ससाठी ५६० रुपयांचं लक्ष्य ठेवलं आहे.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या विश्लेषकांच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२५ च्या जून तिमाहीत आयटीसीचं सिगारेटचं उत्पादन २ ते ३ टक्क्यांनी वाढेल. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीसाठी नुवामानं आयटीसीच्या एफएमसीजी (FMCG) व्यवसायात वार्षिक ७.२ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. मार्च तिमाहीत हा दर ७ टक्के होता.

विलिनीकरणानतर तेजी वाढेल!

आयटीसीच्या हॉटेल व्यवसायाच्या विलीनीकरणानंतर परताव्याचं प्रमाण वाढेल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. कंपनीच्या हॉटेल व्यवसाय विलिनीकरण २०२४ च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.

३६ विश्लेषकांनी केली खरेदीची शिफारस

आयटीसीवर नजर ठेवून असलेल्या ३९ विश्लेषकांपैकी ३६ विश्लेषकांनी कंपनीचे शेअर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या ३६ विश्लेषकांनी आयटीसीच्या शेअर्सना बाय रेटिंग दिलं आहे. तर, दोन विश्लेषकांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तर, केवळ एका विश्लेषकानं विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. सीएनबीसी टीव्ही 18 नं दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.

Whats_app_banner