ITC Demerger News in Marathi : आयटीसीच्या शेअरहोल्डर्ससाठी आज, ६ जानेवारी २०२४ हा मोठा दिवस आहे. आयटीसी हॉटेल्सचा व्यवसाय आयटीसी लिमिटेडपासून वेगळा होत आहे. या प्रक्रियेची रेकॉर्ड डेट आज असून बीएसई आणि एनएसई आज विशेष ट्रेडिंग सेशन आयोजित करत आहेत. आयटीसीचे १० समभाग असलेल्या गुंतवणूकदाराला आयटीसी हॉटेल्सचा एक शेअर मिळणार आहे.
आयटीसी हॉटेल्सचा शेअर आज शेअर बाजारात लिस्ट होणार नाही. तूर्तास एक डमी ट्रिकर असणार आहे. त्यामुळं निफ्टीमध्ये ५१ आणि सेन्सेक्समध्ये ३१ शेअर्स पाहायला मिळतील. आयटीसी हॉटेल्सच्या शेअर्सची लिस्टिंग येत्या काही आठवड्यात होईल. तोपर्यंत आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स कोणीही खरेदी-विक्री करू शकणार नाही.
आयटीसी हॉटेल्सच्या समभागांची किंमत आजच्या विशेष कॉल लिलावाच्या बंद किंमती आणि शुक्रवारच्या क्लोजिंग प्राइसच्या आधारे ठरवली जाईल. या दोन किमतींच्या आधारे आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स कळतील.
आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स १५० ते २०० रुपये प्रति शेअरच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा बहुतांश ब्रोकरेज हाऊसेसनं व्यक्त केली आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं, ब्रोकरेज हाऊस एसबीआय सिक्युरिटीजच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, अल्पावधीत काही भागधारक (विशेषत: ईटीएफ) आयटीसी हॉटेल्समधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळं कंपनीच्या शेअर्सवर दबाव येणार आहे. अल्पकालीन दबावाचा किरकोळ गुंतवणूकदार आणि एचएनआयसाठी दीर्घ मुदतीत फायदा होऊ शकतो, असं एसबीआय सेक्युरिटीजचं मत आहे.