IT Company Job : एका आयटी कंपनीनं एक मोठा आणि अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे इतर आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. एका आयटी कंपनीने १ तृतीयांश मालकी हक्क कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे. Ideas2IT असे या कंपनीचे नाव असून या कंपनीची मूल्यवर्धित रक्कम ही अंदाजे ८.५ अब्ज डॉलर्स एवढी आहे. कंपनीच्या मालकी हक्का पैकी ३३ टक्के मालकी ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना हस्तांतरित केली जाणार आहे. कंपनीच्या ३३ टक्के स्टेकपैकी, टक्के हक्क हे ४० निवडक कर्मचार्यांना दिले जाणार आहेत. जे कंपनीच्या स्थापनेपासून कंपनीसोबत राहिले आहेत. तर उर्वरित स्टेक हे कंपनीच्या ७०० कर्मचार्यांना वितरीत केले जाईल. याशिवाय कंपनी त्यांच्यासोबत पाच वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या ५० कर्मचाऱ्यांना ५० कारही भेट देणार आहे.
आयडियाज २ या आयटीचे संस्थापक मुरली विवेकानंदन म्हणाले, "२००९ मध्ये आम्ही आमच्या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. कंपनी सुरू झाल्यापासून आम्ही मोठी प्रगती केली असून आज आमची कंपनीचे मूल्य हे कोट्यवधी डॉलर्स झाले आहेत. हे यश आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरे करायचे आहे. त्यामुळे आम्ही कंपनीच्या शेअरिंग उपक्रमाचा एक भाग म्हणून एकूण ७५० कर्मचाऱ्यांना कंपनीची सुमारे ३० ते ४० टक्के भागीदारी ही त्यांच्या नावावर केली जाणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा 'कर्मचारी मालकी कार्यक्रम' कर्मचाऱ्यांना मूल्यवान भागधारक बनवणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांमुळे हे शक्य झाले आहे, त्यांना कंपनीच्या दीर्घकालीन यशासाठी आणखी प्रोत्साहित करणार आहे. सध्या कंपनीचे मूल्य हे १०० दशलक्ष डॉलर्स इतके झाले आहे. पुढील चार वर्षांच्या कालावधीत हे मूल्य तिप्पट करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, मुरली विवेकानंदन यांनी यापूर्वी सन, ओरॅकल आणि गुगलसह इतर कंपन्यांमध्ये काम केले आहे. ते सध्या अमेरिकेत राहतात.
कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ८ ते १५ लाख रुपए किमतीत आम्ही कर्मचाऱ्यांना मारुती सुझुकीकडून त्यांच्या आवडीच्या कार देखील भेट दिली जाणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी कोणताही खर्च नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्या आम्ही केवळ ५० कारचे वाटप केले आहे. २०२२ पर्यंत पाच वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना यापूर्वीच १०० कारचे वाटप कंपनीने केले आहे.