Adani Group Share Price : अदानी समूहाच्या शेअर्सचं नेमकं काय करावं ? खरेदी-विक्री की होल्ड?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group Share Price : अदानी समूहाच्या शेअर्सचं नेमकं काय करावं ? खरेदी-विक्री की होल्ड?

Adani Group Share Price : अदानी समूहाच्या शेअर्सचं नेमकं काय करावं ? खरेदी-विक्री की होल्ड?

Mar 16, 2023 04:18 PM IST

Adani Group Share Price : हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सतत चढ उतार दिसत आहे. काही स्टाॅक्समध्ये कधी अप्पर सर्कीट तर कधी लोअर सर्कीट लागत आहेत. गेल्या आठवड्यात मंगळवारपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी दिसत असून बाजारभांडवलातही वाढ झाली आहे.

gautam adani HT
gautam adani HT

Adani Group Share Price : गेल्या आठवड्यात मंगळवारपासून अदानी समूहाच्या शेअर्सने जबरदस्त तेजी घेतली आहे. गेल्या एक महिन्यापासून लोअर सर्किटमध्ये सुरू असलेल्या शेअरमध्येही अचानक बंपर तेजी दिसून आली. गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी अदानी समूहाच्या पाच शेअर्समध्ये अप्पर सर्किट दिसून आले. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अशीच तेजी पुढील आठवड्यातही कायम राहिल अशी अपेक्षा गुंतवणूकदार व्यक्त करत आहेत. हिडेनबर्ग अहवाल २४ जानेवारीला जाहीर झाल्यानंतर अदानी समूहाच्या शेऱअ्समध्ये कमालीची घट झाली होती.

तेंव्हापासून अदानी समूहाच्या सर्व १० कंपन्यांच्या शेअर्समध्ये दररोज घसरण होत होती. समभागांच्या सततच्या घसरणीमुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीतही लक्षणीय घट झाल्याचे दिसून आले. यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानीही अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या ३० मधूनही बाहेर पडले.

मात्र आता अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे अदानी पुन्हा जगातील श्रीमंतांच्या यादीत २४ व्या क्रमांकावर पोहोचले आहे. अदानी शेअर्स तेजीत असताना, या आठवड्यात शेअर्स खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का? असा सवाल सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडला आहे.

अदानी समूहाच्या शेअर्स तेजीमागचे हे आहे खरे कारण

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे एक कारण म्हणजे समूहाला कर्ज मिळणे. अदानी समूहाला तीन अब्ज डॉलर्सचे कर्ज मिळाल्याची बातमी आली होती. अदानी समूहाने मात्र याचा इन्कार केला होता. गेल्या आठवड्यात गुरुवारी अमेरिकन कंपनी जीक्यूजी पार्टनरने अदानी समूहाच्या चार कंपन्यांचे १५,४४६ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांमध्ये झालेली ही पहिलीच मोठी गुंतवणूक होती. याचा मोठा फायदा अदानी समूहाला झाला. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. त्यानंतर अदानी समूहाच्या शेअर्स घसरणीला ब्रेक लागला आहे. त्याचप्रमाणे बाजारभांडवलातही १.७० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

शेअर्स पुन्हा झाले बाऊन्स बॅक

गेल्या चार सत्रांमध्ये अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ५७.३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. २७ फेब्रुवारी रोजी त्याचा बंद भाव १,१९४.२० रुपये होता, जो शुक्रवारी १,८७९.३५ रुपयांपर्यंत पोहोचला.

अदानी पोर्ट्समध्ये २१.७७ टक्के, अदानी विल्मरमध्ये २१.५३ टक्के, अदानी ग्रीन एनर्जीमध्ये २१.५३ टक्के, अदानी पॉवरमध्ये २१.४७ टक्के आणि एनडीटीव्ही (नवी दिल्ली टेलिव्हिजन) मध्ये २१.४७ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे अंबुजा सिमेंट्स, एसीसी, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस ९ ते १९ टक्क्यांनी वधारले आहेत.

Whats_app_banner