Share market investment : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (Sensex) आज ८० हजारांचा टप्पा ओलांडला. सुमारे १८ वर्षांपूर्वी, फेब्रुवारी २००६ मध्ये १०००० च्या पातळीवर असलेला बाजार इतक्या लवकर ८० हजारच्या पुढं जाईल असं कोणाला वाटलं नसेल. त्यामुळं आता गुंतवणूकदार काहीसे संभ्रमात पडले आहेत.
बाजारातील हीच तेजी आणि वेग यापुढंही कायम राहणार का? सध्याच्या तेजीच्या वादळात छोट्या गुंतवणूकदारांनी काय करावं? बाजारात पैसे गुंतवायचे की मोठ्या करेक्शनची प्रतीक्षा करायची? अशा वेळी बाजारापासून दूर राहायचं की त्याच्या गतीनं धावायचं? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना सतावत आहेत. शेअर बाजार तज्ज्ञ कविंद्र सचान यांनी आमची सहयोगी वेबसाइट ‘लाइव्ह हिंदुस्तान’शी बोलताना या संदर्भात मार्गदर्शन केलं आहे.
सचान यांच्या मतानुसार, हाच वेग कायम राहिल्यास लवकरच सेन्सेक्स १ लाखाचा टप्पा पार करेल. बाजारात सध्या ज्या प्रकारची तेजी दिसूत आहे, त्यामुळं पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तुटलेले दिसत आहेत. पण ही तेजी वास्तविक आहे. इथं कोणतेही कृत्रिम बुडबुडे नाहीत. निफ्टी-५० मध्येही कुठंही मोठं करेक्शन आलेलं नाही. बँक निफ्टीनंही ५३००० ची पातळी ओलांडण्यात यश मिळविलंय. आठवडाभर बाजार या पातळीवर टिकून राहिल्यास चांगली तेजी दिसून येईल. निफ्टी आठवडाभर २४ हजारच्या पुढं राहिल्यास बाजार पुन्हा धावेल.
सचान म्हणाले, ‘बाजारात गुंतवणूक करत राहायला हवी. गेल्या १८ वर्षांत सेन्सेक्सनं ७० हजार अंकांची झेप घेतली आहे. येत्या काही वर्षात तो कुठं पोहोचू शकतो याची कल्पना यावरून करता येईल. एक लाखाचा आकडाही सहज पार होईल.’
बहुतांश शेअर बाजार विश्लेषकांच्या मते, भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या जगात सर्वोत्तम कामगिरी करणारी करत आहे. देशाची चालू वित्तीय तूटही कमी झाली आहे. त्यामुळं देशी-विदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. जागतिक पातळीवरही भारताविषयी सकारात्मक वातावरण आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या घोषणेकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही कपात झाल्यास शेअर बाजारातील तेजी कायम राहू शकते.
स्मॉल केस अँड स्टॉक बाजारचे संस्थापक आशिष कुमार यांनी कविंद्र सचान यांच्यापेक्षा वेगळं मत नोंदवलं आहे. त्यांंनी गुंतवणूकदारांना सावध केलं आहे. 'सेन्सेक्स ८० हजारांवर पोहोचल्यानंतर गुंतवणूकदारांनी सावधपणे पुढं जावं. अर्थसंकल्पाचा महिना आणि पहिल्या तिमाहीच्या (Q1FY25) निकाल येणार असल्यानं राजकीय धोरणं आणि कॉर्पोरेट जगतातील घडामोडींची माहिती ठेवणं महत्त्वाचं आहे. गुंतवणुकीत वैविध्य आणि फंडामेंटली मजबूत स्टॉक्सवर लक्ष केंद्रित केल्यास जोखीम कमी होऊ शकते. पोर्टफोलिओचा आढावा घेऊन काही प्रमाणात नफा पदरात पाडून घ्या. त्याचबरोबर विकासासाठी सज्ज असलेल्या क्षेत्रात गुंतवणुकीची संधी शोधा. बाजारातील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी देशांतर्गत व जागतिक पातळीवरील घडामोडींवर लक्ष ठेवा, असं आशिष कुमार यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या