Share Market News : इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी (Ireda) अर्थात इरेडानं तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. त्यानुसार, डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीला ४२५.५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मात्र त्यानंतर शेअरच्या किंमतीत आज ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल.
इरेडाचा शेअर बीएसईवर आज २१८.३५ रुपयांवर खुला झाला. मात्र, शेअरमध्ये उत्तरोत्तर घसरण सुरू झाली आणि १.३० मिनिटांपर्यंत शेअर ४.६४ टक्क्यांनी घसरला आणि २०६.०७ रुपयांवर पोहोचला.
कंपनीच्या निव्वळ नफ्यात २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३३५.५० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. डिसेंबर तिमाहीत इरेडाचा महसूल ३५.६० टक्क्यांनी वाढून १६९८.४५ कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी डिसेंबर तिमाहीत इरेडा कंपनीचा महसूल १२०८.१० कोटी रुपये होता.
लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन म्हणाले, 'इरेडाची आर्थिक कामगिरी अत्यंत मजबूत आहे. कंपनी सौर ऊर्जा क्षेत्रातील संधींचा वाढता फायदा घेत असल्याचं हे द्योतक आहे. त्यामुळं महसूल आणि नफ्यात सातत्य दिसत आहे. त्यामुळं इरेडाच्या शेअरमध्ये खरेदीची संधी दिसत आहे.
सुमित बागरिया यांनी देखील इरेडाच्या शेअरबाबत मत व्यक्त केलं आहे. 'टेक्निकल चार्टवर इरेडाच्या शेअरला २०० रुपयांवर भक्कम आधार आहे. हा शेअर २३० रुपयांचा टप्पा ओलांडण्यात यशस्वी झाला तर मध्यम मुदतीत तो २६० रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या