IRFC च्या शेअरमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ; विकावा की ठेवावा? काय म्हणतात तज्ञ?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IRFC च्या शेअरमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ; विकावा की ठेवावा? काय म्हणतात तज्ञ?

IRFC च्या शेअरमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ; विकावा की ठेवावा? काय म्हणतात तज्ञ?

Jan 31, 2025 03:23 PM IST

IRFC Share Price : इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात आयआरएफसीच्या शेअरमध्ये आज मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर तज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

IRFC च्या शेअरमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ; विकावा की ठेवावा? काय म्हणतात तज्ञ?
IRFC च्या शेअरमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ; विकावा की ठेवावा? काय म्हणतात तज्ञ?

Stocks in Focus : इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन (IRFC) कंपनीच्या शेअरच्या किमतीत आज जवळपास २ टक्क्यांची वाढ झाली. दिवसअखेर हा शेअर १५१ रुपयांवर बंद झाला. बाजारातील सकारात्मक वातावरण आणि कंपनीचं स्थैर्य आणि वाढीच्या क्षमतेबद्दल गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेला विश्वास हे शेअरमधील वाढीचं कारण आहे.

अलीकडील आर्थिक अहवालांतून IRFC च्या उत्तम कामगिरीची आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबर २०२४ ला संपलेल्या तिमाहीत कंपनीनं अंदाजे ६७६३.४२ कोटी रुपयांची निव्वळ विक्री नोंदवली. त्यामुळं गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. संपूर्ण भारतातील रेल्वे प्रकल्पांना निधी पुरवणाऱ्या या कंपनीसाठी सातत्यपूर्ण महसूल निर्मिती हा घटक महत्त्वपूर्ण आहे. नियंत्रणात असलेली कर्जाची पातळी आणि पुरेशा लिक्विडिटीसह कंपनीचा ताळेबंद मजबूत आहे. त्यामुळंच बाजारातील अस्थिरतेमध्ये स्थिरता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी IRFC हा एक आकर्षक पर्याय बनला आहे.

शेअरच्या वाटचालीबाबत तज्ञांना काय वाटतं?

अलीकडील तेजीच्या अनुषंगानं बाजार तज्ञांनी आयआरएफसीच्या शेअरचं विश्लेषण केलं आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजमधील राजेश कुमार यांच्या मते, शेअरच्या वरच्या दिशेनं सुरू असलेल्या वाटचालीचं श्रेय पायाभूत सुविधांमधील धोरणात्मक गुंतवणूक आणि रेल्वे सेवा वाढविण्याच्या उद्देशानं अनुकूल सरकारी धोरणं यांना दिलं जाऊ शकतं. भारतानं रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणं सुरू ठेवल्यानं, IRFC सारख्या कंपन्यांना लक्षणीय फायदा होणार आहे, असं राजेश कुमार म्हणाले.

IRFC चा शेअर सध्या त्याच्या ऐतिहासिक उच्चांकांच्या तुलनेत खूपच खालच्या पातळीवर व्यवहार करत आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २२९ आणि नीचांक ११६.६५ रुपये आहे. अनेक गुंतवणूकदार सध्याच्या भावाकडं प्रवेशाची संधी म्हणून पाहत आहे. कारण पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वाढ होत असल्यानं भविष्यात नफ्याची शक्यता आहे, असंही बाजार तज्ञांचं मत आहे.

गुंतवणूकदारांवर परिणाम करणारे आर्थिक घटक

IRFC च्या शेअरच्या किमतीत झालेली वाढ ही भारताच्या भांडवली बाजारातील व्यापक आर्थिक ट्रेंडचेही प्रतिबिंब आहे. रेल्वे नेटवर्कचे आधुनिकीकरण आणि विस्तार करण्याच्या दिशेनं सरकारनं चालवलेल्या प्रयत्नामुळं IRFC सारख्या कंपन्यांकडून निधीची आवश्यकता वाढली आहे. हे कंपनीच्या वाढीसाठी अनुकूल आहे.

अर्थसंकल्पात वाढीव तरतुदीची शक्यता

आगामी आर्थिक वर्षात रेल्वेसाठी वाढीव अर्थसंकल्पीय तरतूत केली जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. IRFC सारख्या संस्थांकडून वित्तपुरवठ्यासाठी सतत मागणी असेल हे यातून दिसून येत आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner