Ireda q2 results : इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या अर्थात इरेडानं दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. निकालानुसार कंपनीला मोठा नफा झाला असून त्यांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसत आहे. कंपनीच्या शेअरमध्ये आज तेजी दिसत आहे.
गुरुवारच्या बंदच्या तुलनेत आज इरेडाचा शेअर जवळपास २ टक्क्यांनी वाढून २३८.१० रुपयांवर उघडला. त्यानंतर तो किंचित खाली आला असला तरी वधारून व्यवहार करत आहे.
कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला ३८७.७४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ३६ टक्के आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २८४.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर जुलै तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ३८३ कोटी रुपये होता.
सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जून ते सप्टेंबर या तिमाहीत इरेडाचं उत्पन्न १६३० कोटी रुपये होतं. मागील वर्षीच्या तुलनेत ते ३८.५० टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर तिमाहीत कंपनीचं उत्पन्न ११७७ कोटी रुपये होतं.
कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नातही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचं निव्वळ व्याज उत्पन्न (Net Interest Income) ३५९.८० कोटी रुपये आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ते ५२ टक्के अधिक आहे. त्याचबरोबर कंपनीच्या एनपीएमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीचा एनपीएही यावेळी २.१९ टक्के राहिला आहे.
इरेडाच्या शेअर्सनी यंदा चमकदार कामगिरी केली आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत कंपनीनं शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना १२४ टक्के परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेअरची किंमत ४१ टक्क्यांनी वाढली आहे. बीएसईमध्ये इरेडाचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३१० रुपये आहे. सध्या हा शेअर २३५ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे.