अवघ्या महिनाभरात १९ टक्क्यांनी घसरला सरकारी कंपनीचा शेअर, आता काय करायचं?-ireda share falls 19 percent what investors do next expert giving this advice ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अवघ्या महिनाभरात १९ टक्क्यांनी घसरला सरकारी कंपनीचा शेअर, आता काय करायचं?

अवघ्या महिनाभरात १९ टक्क्यांनी घसरला सरकारी कंपनीचा शेअर, आता काय करायचं?

Aug 27, 2024 11:39 AM IST

Ireda Share Price : गेल्या काही दिवसांपासून इरेडाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. कंपनीचे समभाग आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून १९ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. या आठवड्यात मंडळाची बैठक होणार आहे.

Ireda Share Price : अवघ्या महिनाभरात १९ टक्क्यांनी घसरला सरकारी कंपनीचा शेअर
Ireda Share Price : अवघ्या महिनाभरात १९ टक्क्यांनी घसरला सरकारी कंपनीचा शेअर

share market news today : नुतनीकृत ऊर्जा क्षेत्राला अर्थसहाय्य करणारी सरकारी कंपनी इरेडाच्या शेअर्सची घसरण सातत्यानं सुरू आहे. काल, आठवड्याच्या पहिल्या दिवशी कंपनीचा शेअर २.५९ टक्क्यांनी घसरून २५३.५५ रुपयांवर बंद झाला. मागील महिनाभरात हा शेअर १९ टक्क्यांनी घसरला आहे.

सध्या कंपनीचा शेअर घसरत असला तरी कंपनीनं यंदा उत्तम परतावा दिला आहे. त्यामुळं पोझिशनल गुंतवणूकदारांनी भरघोस नफा कमावला आहे. २०२४ मध्ये इरेडाच्या शेअर्सची (Ireda Share Price) किंमत १४२.२८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी २९ नोव्हेंबरला शेअर बाजारात इरेडाचा शेअर सूचीबद्ध झाला होता. आयपीओच्या वेळी शेअरची इश्यू प्राइस फक्त ३२ रुपये होती. 

गेल्या काही दिवसांच्या भरघोस परताव्यानंतर आता इरेडाच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. १५ जुलै रोजी शेअरचा भाव ३१० रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर होता. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये १८.२१ टक्क्यांची घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांना हा एक प्रकारचा धक्का आहे.

मार्केट एक्सपर्ट्स काय म्हणतात…

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, सेंक्टम वेल्थशी संबंधित आदित्य अग्रवाल म्हणतात, अल्प कालावधीचा विचार केल्यास या शेअरमध्ये काहीतरी सकारात्मक अपेक्षित आहे. हा शेअर २७५ ते २८० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तर, खाली आल्यास शेअरची किंमत २३० रुपयांच्या पातळीवर येऊ शकते. 

कंपनीनं अलीकडंच शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी ४५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना आखत आहेत. कंपनी या आठवड्यात या विषयावर निर्णय घेईल. येत्या २९ ऑगस्ट रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत हा निर्णय अपेक्षित आहे. त्याचा परिणाम शेअरवर दिसू शकतो.

तिमाही निकाल काय सांगतो?

जूनची तिमाही इरेडासाठी चांगली होती. या काळात कंपनीला ३८४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मागील वर्षाशी तुलना करता हा नफा ३० टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २९५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. एप्रिल ते जून या कालावधीत इरेडाचा महसूल ३२ टक्क्यांनी वाढून १५१० कोटी रुपये झाला आहे. तर, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचं लोनबुक ६३,२०७ कोटी रुपये होतं. इरेडा ही 'नवरत्न' कंपनी आहे. या कंपनीत सरकारचा सर्वात मोठा हिस्सा आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

विभाग