irdai new claim settlement rules : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणनं वाहन विमा (motor insurance rules) पॉलिसीशी संबंधित अनेक नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार कागदपत्रं नसल्याची सबब देऊन यापुढं कोणत्याही विमा कंपनीला इन्शुरन्स क्लेम नाकारता येणार नाही. सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
आयआरडीएआयनं या संदर्भात सविस्तर परिपत्रक काढलं आहे. त्यात विम्यासंबंधी इतर काही बदलांचीही माहिती दिली आहे. त्यानुसार पॉलिसीधारक यापुढं त्यांची वाहन विमा पॉलिसी काही अटींच्या अधीन राहून रद्द करू शकतात. तसचं, विम्याच्या उर्वरित कालावधीचा परतावा देखील क्लेम करू शकतात.
ग्राहकांनी विम्याच्या भरपाईची मागणी केल्यास कंपन्यांकडून वेगवेगळी कागदपत्रं मागवली जातात. प्रत्येक वेळी ती सादर करणं ग्राहकाला शक्य नसतं. सर्वसामान्य लोक यामुळं भंडावून जातात. हे सगळं आता बंद होणार आहे. कंपन्यांनी ग्राहकांकडं फक्त तीच कागदपत्रं मागावीत, जी विम्याच्या दाव्याचा निपटारा करण्याशी संबंधित आहेत, असं विमा प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे. गरज भासल्यास ड्रायव्हिंग लायसन्स, परमिट, फिटनेस, एफआयआर, अनट्रेस रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट ही कागदपत्रं मागवता येतील.
ग्राहकानं भरपाईचा दावा केल्यानंतर व सर्व्हे रिपोर्ट आल्यानंतर सात दिवसांच्या आत कंपनीनं क्लेम सेटलमेंट करणं गरजेचं आहे, असंही प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे.
एखाद्या पॉलिसीधारकाला पॉलिसी रद्द करायची असल्यास त्याला त्याचं कारण देण्याची गरज नाही. ग्राहकानं पॉलिसी रद्द केल्यास विमा कंपनीला उर्वरीत पॉलिसी कालावधीसाठी त्या विशिष्ट प्रमाणात प्रीमियम परत करणं आवश्यक आहे. अर्थात, त्यासाठी पॉलिसीची मुदत एका वर्षाची असावी व त्या कालावधीत ग्राहकानं कोणताही दावा केलेला नसावा. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या पॉलिसींच्या संदर्भात, उर्वरीत कालावधीसाठी प्रीमियम परत केला पाहिजे. ग्राहकानं फसवणूक केल्याचा पुरावा आढळल्यास मात्र विमा कंपनी पॉलिसी रद्द करू शकते. यासाठी विमा कंपनी ग्राहकाला किमान ७ दिवसांची नोटीस देऊ शकते.
विमा कंपन्यांनी प्रत्येक ग्राहकाला ग्राहक माहिती पत्रक (CIS) दिलं पाहिजे. त्या माध्यमातून ग्राहकांना सोप्या शब्दात पॉलिसीबद्दल माहिती मिळू शकेल. यात पॉलिसीची सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये स्पष्ट केलेली असावीत. त्यात कव्हरेजची व्याप्ती, ॲड-ऑन, विमा रकमेचा आधार, विमा रक्कम, विशेष अटी आणि वॉरंटी, दावा प्रक्रिया आणि इतर माहितीसह सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल.
संबंधित बातम्या