ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी! आता आरोग्य विम्याच्या हप्त्यावर कंपन्यांची मनमानी चालणार नाही, IRDAI चे निर्देश
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी! आता आरोग्य विम्याच्या हप्त्यावर कंपन्यांची मनमानी चालणार नाही, IRDAI चे निर्देश

ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी! आता आरोग्य विम्याच्या हप्त्यावर कंपन्यांची मनमानी चालणार नाही, IRDAI चे निर्देश

Jan 31, 2025 12:28 AM IST

IRDAI Limits on Annual Health Insurance Premium hike: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यात वर्षभरात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करू नये.

 Insurance
Insurance

IRDAI Limits on Annual Health Inshurance Premium hike: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यात वर्षभरात १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करता येणार नाही.

IRDAI Limits on Annual Health Inshurance Premium hike: अर्थसंकल्पापूर्वीच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीए) आरोग्य विम्याच्या प्रीमियमबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यात वर्षभरात १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करू नये, असे निर्देश नियामकाने विमा कंपन्यांना दिले आहेत. किंबहुना काही आरोग्य विमा उत्पादनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी (६० वर्षे किंवा त्यावरील) प्रीमियम दरात मोठी वाढ झाल्याचे आयआरडीएच्या निदर्शनास आल्याने आयआरडीएने परिपत्रक काढून सर्व सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांना या बाबतचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्य विम्याच्या हप्त्याला आळा घालण्यासाठी आणि त्यांचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आयआरडीएने हे पाऊल उचलले आहे. विशेषत: जेव्हा त्यांना वय आणि आरोग्याच्या गरजांमुळे प्रचंड विम्याच्या हप्ता दरवाढीचा सामना करावा लागत होता. या बाबत आयआरडीएच्या निवेदनात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. आयआरडीए विमा बाजारावर बारकाईने लक्ष ठेवणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा उत्पादनांच्या संदर्भात या नव्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते की नाही याकडे देखील नियामक विशेष लक्ष देणार आहे.

विमा उत्पादन वढी संदर्भात आयआरडीएचा घ्यावा लागणार सल्ला

आयआरडीएच्या परिपत्रकानुसार, विमा कंपन्यांना आता कोणतेही वैयक्तिक आरोग्य विमा उत्पादन काढून घेण्यापूर्वी नियामकाचा सल्ला घ्यावा लागणार आहे. आयआरडीएआयने असेही म्हटले आहे की, विमा कंपनीला रुग्णालयांचा समावेश करण्यासाठी योग्य व तातडीची पावले उचलावी लागतील आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या (पीएमजेएवाय) योजनेअंतर्गत किंवा त्या धर्तीवर पॅकेज दर निश्चित करावे लागतील.

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना आरोग्य कव्हरेज देण्यास मान्यता दिली होती. नुकतेच केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी सांगितले की, ७० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाचे ६ कोटी नागरिक आयुष्मान भारत अंतर्गत आले आहेत. 

Whats_app_banner