Stock Market : शेअर बाजारासाठी हा आठवडा घडामोडींचा! एकामागोमाग एक ५ कंपन्यांचे आयपीओ उघडणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market : शेअर बाजारासाठी हा आठवडा घडामोडींचा! एकामागोमाग एक ५ कंपन्यांचे आयपीओ उघडणार

Stock Market : शेअर बाजारासाठी हा आठवडा घडामोडींचा! एकामागोमाग एक ५ कंपन्यांचे आयपीओ उघडणार

Feb 03, 2025 10:58 AM IST

IPOs This Week : बजेटनंतर शेअर बाजारात चढउतार होत असताना आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. या आठवड्यात एकूण ५ आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत.

IPO Alert : हा आठवडा घडामोडींचा! एकामागोमाग एक ५ कंपन्यांचे आयपीओ उघडणार
IPO Alert : हा आठवडा घडामोडींचा! एकामागोमाग एक ५ कंपन्यांचे आयपीओ उघडणार

Stock Market News : केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर चढउतार सुरू आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सेन्सेक्स आणि निफ्टी चांगलेच घसरले आहेत. या सगळ्या अस्थिर वातावरणात गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. चालू आठवड्यात एकूण ५ कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. त्यामुळं हा आठवडा खूपच घडामोडींचा ठरणार आहे.

याआधीच्या महिन्यात, म्हणजेच जानेवारीमध्ये २७ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ७३५४ कोटी रुपये उभे केले होते. येत्या काळातही हा सिलसिला सुरूच राहील असं दिसतंय. चालू आठवड्यात नेमके कोणत्या कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत पाहूया…

चामुंडा इलेक्ट्रिकल्स

चामुंडा इलेक्ट्रिकल्सचा आयपीओ मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना अर्ज करण्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे. या आयपीओसाठी प्राइस बँड ४७ ते ५० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीच्या आयपीओचा आकार १४.६० कोटी रुपये आहे.

केन एन्टरप्राइझेस

वस्त्रोद्योग उत्पादन क्षेत्रातील या कंपनीचा आयपीओ ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला राहणार आहे. आयपीओसाठी कंपनीनं ९४ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओचा आकार ८३.६५ कोटी रुपये आहे.

एमविल हेल्थकेअर

एमविल हेल्थकेयर कंपनीच्या आयपीओसाठी प्राइस बँड १०५ ते १११ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. या माध्यमातून ४४.०३ लाख नवे शेअर्स आणि १० लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जाणार आहेत. हा आयपीओ ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत खुला राहणार आहे.

रेडीमिक्स कन्स्ट्रक्शन मशिनरी

या आयपीओचा आकार ३७.६६ कोटी रुपये आहे. या आयपीओचा दरपट्टा प्रति शेअर १२१ ते १२३ रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. कंपनीचा आयपीओ ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल.

एलिगेन्झ इंटिरिअर्स

हा आयपीओ ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान खुला असेल. आयपीओसाठी प्राइस बँड १२३ ते १३० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी ७८.०७ कोटी रुपये उभारणार आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner