IPO News : ‘द केरला स्टोरी’चे निर्माते विपुल शहा आता शेअर बाजार गाजवणार, फक्त सेबीच्या मंजुरीची प्रतीक्षा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO News : ‘द केरला स्टोरी’चे निर्माते विपुल शहा आता शेअर बाजार गाजवणार, फक्त सेबीच्या मंजुरीची प्रतीक्षा

IPO News : ‘द केरला स्टोरी’चे निर्माते विपुल शहा आता शेअर बाजार गाजवणार, फक्त सेबीच्या मंजुरीची प्रतीक्षा

Jan 04, 2025 12:39 PM IST

Sunshine Picutres IPO News : द केरला स्टोरी सिनेमाचे निर्माते विपुल शहा यांनी आपली कंपनी सनशाईन पिक्चर्सचा आयपीओ आणण्याची तयारी सुरू केली आहे.

'द केरला स्टोरी' फेम निर्माते विपुल शहा यांच्या कंपनीचा आयपीओ येतोय! सेबीच्या मंजुरीची प्रतीक्षा
'द केरला स्टोरी' फेम निर्माते विपुल शहा यांच्या कंपनीचा आयपीओ येतोय! सेबीच्या मंजुरीची प्रतीक्षा

IPO News in Marathi : नवीन वर्ष हे आयपीओसाठी धडाकेबाज ठरण्याचा अंदाज आहे. यंदा मनोरंजन क्षेत्रातील कंपन्याही आयपीओ घेऊन येत असून या यादीत सनशाईन पिक्चर्स लिमिटेड कंपनीचा समावेश आहे. निर्माते-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शहा यांनी आयपीओच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी सेबीकडं कागदपत्रे दाखल केली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ८३.७५ लाख समभागांचा हा प्रस्तावित आयपीओ असून तो ५० लाख नवीन शेअर्स आणि ३३.७५ लाख शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) चं मिश्रण असेल. आयपीओच्या माध्यमातून प्रवर्तक विपुल अमृतलाल शहा २३.६९ लाख शेअर्स विकण्याच्या विचारात आहेत. तर, शेफाली विपुल शहा १०.०५ लाख शेअर्स विकण्याची शक्यता आहे.

आयपीओच्या पैशाचं काय करणार?

सनशाईन पिक्चर्स लिमिटेडनं आयपीओमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वापर आपल्या दीर्घकालीन कार्यशील भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी करण्याची योजना आखली आहे. याव्यतिरिक्त, ९४ कोटी रुपये भविष्यातील विकास आणि ऑपरेशन्ससह इतर सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरले जातील. आयपीओ हाताळण्यासाठी जीवायआर कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स ही एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर असेल.

सनशाईन पिक्चर्सचा व्याप मोठा

सनशाईन पिक्चर्स ही चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मिती, विकास, विपणन आणि वितरणाच्या व्यवसायात गुंतलेली एक प्रसिद्ध प्रॉडक्शन कंपनी आहे. दे केरला स्टोरी, कमांडो, फोर्स, अ‍ॅक्शन रिप्ले यांसारख्या चित्रपटांची निर्मिती या कंपनीनं केली आहे. द केरला स्टोरीवरून बराच वाद झाला होता. विपुल शहा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शेअर बाजारात उतरल्यास सनशाईन पिक्चर्सची स्पर्धा पॅनोरमा स्टुडिओ इंटरनॅशनल, बावेजा स्टुडिओज आणि बालाजी टेलिफिल्म्स सारख्या लिस्टेड कंपन्यांशी होणार आहे.

कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती?

सनशाईन पिक्चर्स लिमिटेड ही कंपनी गेल्या तीन आर्थिक वर्षांपासून आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत नफ्यात आहे. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा नफा ४५.६४ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५२.४५ कोटी रुपये, २०२३ मध्ये २.३१ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ११.२ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचे कामकाजातून उत्पन्न १३३.८ कोटी रुपये, २०२३ मध्ये २६.५१ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ८७.१३ कोटी रुपये होते, तर आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीनं ३९.०२ कोटी रुपये कमावले.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner