बाजार नियामक सेबीने डेट सिक्युरिटीजच्या पब्लिक इश्यूसाठी अर्ज प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदारांना बाजार मध्यस्थांमार्फत पाच लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी निधी 'ब्लॉक' करण्यासाठी केवळ यूपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस) वापरण्यास सांगण्यात आले आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) परिपत्रकात असेही म्हटले आहे की, गुंतवणूकदारांना सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँका किंवा शेअर मार्केट प्लॅटफॉर्मद्वारे अर्ज करण्यासारख्या इतर मार्गांनी अर्ज करण्याचा पर्याय कायम राहील. या तरतुदी १ नोव्हेंबरपासून डेट सिक्युरिटीजच्या पब्लिक इश्यूंना लागू होतील.
डेट सिक्युरिटीज, नॉन कन्व्हर्टिबल रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, म्युनिसिपल डेट सिक्युरिटीज आदींच्या सार्वजनिक निर्गमासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करणे आणि इक्विटी शेअर्सच्या सार्वजनिक निर्गमाच्या बाबतीत अर्ज प्रक्रियेशी सुसंगत करणे हे या निर्णयाचे उद्दीष्ट आहे.
बाजार मध्यस्थ (नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर्स, डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स इत्यादी) यूपीआयचा वापर वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून पाच लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी निधी रोखण्यासाठी करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, त्यांना मध्यस्थांकडे सादर केलेल्या निविदा -अर्जात त्यांच्या बँक खात्याशी जोडलेला यूपीआय आयडी देणे आवश्यक आहे.
सेबीने गेल्या आठवड्यात नियमांमध्ये बदल करून डेट सिक्युरिटीज जाहीर करण्याची प्रक्रिया सुरळीत केली. अशा जारीकर्त्यांना निधी लवकर मिळावा हा यामागचा उद्देश आहे.