International Womens Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या आर्थिक भविष्याची तजवीज करणंही महत्त्वाचं आहे. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही त्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त ठरू शकते. योग्य वेळी या योजनेत गुंतवणूक केल्यास २१ व्या वर्षी तुमच्या लाडकी मुलगी लखपती बनू शकते. जाणून घेऊया या योजनेविषयी…
'बेटी बचाओ, बेटी पढाओ' (beti bachao beti padhao) मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुरू केली. शिक्षणाबरोबरच मुलीच्या लग्नाच्या खर्चाची चिंता दूर करणारी ही योजना आहे. एखाद्या व्यक्तीनं मुलीच्या जन्मानंतर लगेचच या योजनेत दरमहा १२,५०० गुंतवल्यास त्याची मुलगी वयाच्या २१ व्या वर्षी लखपती होऊ शकते.
मुलगी १४ वर्षांची होईपर्यंत सुकन्या समृद्धी योजना खात्यात पैसा जमा करता येऊ शकतात. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर मॅच्युरिटी रकमेच्या ५० टक्के रक्कम काढता येते आणि मुलगी २१ वर्षांची झाल्यावर उर्वरित रक्कम काढता येते. मात्र, १८ वर्षांनंतर एखाद्यानं पैसे काढले नसल्यास त्याच्या मुलीला २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण रक्कम काढता येते.
जर तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मानंतर SSY खात्यात दरमहा १२,५०० हजार रुपये किंवा वर्षाला १.५० लाख रुपये गुंतवायला सुरुवात केली आणि त्यावर सरासरी ८ टक्के व्याज गृहित धरले तर मुलगी २१ वर्षांची होईपर्यंत तुमच्याकडं अंदाजे ६९ लाख रुपये असतील. ही रक्कम तुमच्या लाडक्या मुलीच्या लग्नाचा आणि शिक्षणाचा खर्च सहज भागवेल.
चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी लहान बचत योजनांचे व्याजदर जाहीर करताना केंद्र सरकारने SSY व्याजदर ८.२ टक्के जाहीर केला आहे. हा व्याज दर प्रत्येक तिमाहीत बदलत असतो. तो बदलला तरीही योजनेच्या मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला सुमारे ८ टक्के निव्वळ परतावा अपेक्षित आहे.
सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत सूट देण्यात आली आहे. या अंतर्गत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात SSY खात्यात गुंतवणूक केलेल्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर करलाभ मिळवू शकते. या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची एकूण रक्कम करमुक्त आहे. हा आर्थिक फायदा गृहित धरल्यास सुकन्या समृद्धी योजना खूपच फायदेशीर ठरते.