Interest Rates News in Marathi : सुधारित व विलंबित इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंगसाठी मुदतवाढ देणाऱ्या केंद्र सरकारनं छोट्या गुंतवणूकदारांची मात्र निराशा केली आहे. सरकारनं १ जानेवारी २०२४ पासून सुरू होणाऱ्या चौथ्या तिमाहीसाठी पीपीएफ आणि एनएससीसह विविध अल्पबचत योजनांवरील व्याजदर कायम ठेवले आहेत. सलग चौथ्यांदा व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं या संदर्भात अधिसूचना काढली आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या कालावधीतील विविध लघुबचत योजनांवरील व्याजदर आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी (१ ऑक्टोबर २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४) अधिसूचित केलेल्या दरांप्रमाणेच राहतील, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.
सुकन्या समृद्धी योजनेतील ठेवींवर ८.२ टक्के व्याज दर असेल, तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदर चालू तिमाहीत ७.१ टक्के कायम राहील.
लोकप्रिय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि पोस्ट ऑफिस बचत ठेव योजनांचे व्याजदर ही अनुक्रमे ७.१ टक्के आणि ४ टक्के कायम ठेवण्यात आले आहेत.
किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.५ टक्के असेल आणि गुंतवणूक ११५ महिन्यांत परिपक्व होईल.
जानेवारी ते मार्च २०२५ या कालावधीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ७.७ टक्के राहील.
चालू तिमाहीप्रमाणेच मासिक उत्पन्न योजनेतही गुंतवणूकदारांना ७.४ टक्के उत्पन्न मिळणार आहे.
गेल्या चार तिमाहींपासून व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी सरकारनं काही योजनांमध्ये बदल केले होते. पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालविल्या जाणाऱ्या अल्पबचत योजनांवरील व्याजदर सरकार दर तिमाहीला जाहीर करते.
संबंधित बातम्या