Penny stock Integra Essentia : एलआयसीची मोठी गुंतवणूक असलेला इंटिग्रा एसेन्शिया लिमिटेडचा शेअर आज प्रचंड चर्चेत होता. हा शेअर आज १० टक्क्यांनी वधारला आणि ४.४१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. कंपनीच्या संदर्भात आलेल्या एका बातमीमुळं ही तेजी आल्याचं बोललं जात आहे.
इंटिग्रा एसेन्शिया लिमिटेडनं नुकतीच शेअर मार्केटला काही माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनीला कृषी आणि पायाभूत सुविधा व्यवसायासाठी २८० दशलक्ष रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. ही माहिती बातमीच्या स्वरूपात प्रसिद्ध होताच कंपनीचे शेअर आजच्या व्यवहारात जोरदार वाढले. या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत ७.६९ रुपये आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत २.५० रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ४६९.७८ कोटी रुपये आहे.
इंटिग्रा एसेन्शियाचे तिमाही निकालही उत्साहवर्धक आहेत. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५ मध्ये या कंपनीची निव्वळ विक्री ५६.५ टक्क्यांनी वाढून ८६.०६ कोटी रुपये झाली आहे. ऑपरेटिंग नफा ५२.३ टक्क्यांनी वाढून ४.०९ कोटी रुपये झाला आहे आणि निव्वळ नफा मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १११.८ टक्क्यांनी वाढून २.३६ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२४ मध्ये निव्वळ विक्री ५०.४ टक्क्यांनी वाढून २७७.२७ कोटी रुपये आणि निव्वळ नफा १३१.४ टक्क्यांनी वाढून १५.२८ कोटी रुपये झाला आहे.
इंटिग्रा एसेन्शिया लिमिटेड (IEL) ही एक बहुआयामी कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय अन्न, वस्त्रोद्योग, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा या चार मुख्य क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. यात कृषी उत्पादने, वस्त्रोद्योग आणि कपडे, बांधकाम साहित्य, अक्षय ऊर्जा उपकरणे इत्यादींचा समावेश आहे. आधुनिक जीवनशैलीसाठी लागणाऱ्या अनेक गरजांची पूर्तता कंपनीच्या उत्पादनांद्वारे केली जाते.
इंटिग्रा एसेन्शियाच्या जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, एलआयसीकडं इंटिग्राचे ४८,५९,९१६ शेअर आहेत. हा आकडा कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या १.०६ टक्के आहे.