TN Govt on Adani Group : तामिळनाडू वीज वितरण महामंडळानं अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (AESL) ला स्मार्ट मीटर खरेदी करण्यासाठी दिलेली जागतिक निविदा रद्द केली आहे. कंपनीनं सांगितलेल्या किंमती जास्त असल्याचं कारण यासाठी देण्यात आलं आहे. अदानी समूहासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. या निर्णयाचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत.
केंद्र सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत स्मार्ट मीटर देण्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये चार पॅकेजच्या स्वरूपात निविदा जारी करण्यात आल्या होत्या. अदानी समूहानं त्यासाठी सर्वात कमी बोली लावली होती. त्यामुळं अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडला हे कंत्राट मिळणार हे जवळपास स्पष्ट होतं. मात्र आता ती निविदाच रद्द करण्यात आली आहे.
तामिळनाडू सरकारच्या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारात जाणवत आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्सच्या शेअरमध्ये कमालीचे चढउतार होत आहेत. आज कंपनीचा शेअर ८०८ रुपयांवर उघडला आणि दिवसभरातील नीचांकी ८०२ रुपयांवर पोहोचला. मात्र, दरम्यानच्या काळात तो ८१०.८५ रुपयांच्या पातळीवरही पोहोचला. सकाळी १०.३० च्या सुमारास NSE वर अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स ०.१७ टक्क्यांनी वाढून ८०६.८५ रुपयांवर व्यवहार करत होते.
सरकारी सूत्रांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या माहितीनुसार, बीएसई-सूचीबद्ध कंपनी AESL नं चेन्नईसह आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या निविदेतील पॅकेज-१ साठी सर्वात कमी बोली लावली होती. यामध्ये ८२ लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसविण्याचा समावेश आहे. तथापि, २७ डिसेंबर २०२४ रोजी ही निविदा रद्द करण्यात आली. अदानी एनर्जी सोल्युशन्सनं यासाठी कोट केलेली किंमत जास्त होती, असं कारण त्यासाठी देण्यात आलं.
सकाळी १०.३० च्या सुमारास अदानी ग्रीन एनर्जी ०.१५ टक्क्यांनी घसरून १०४४.८० रुपयांवर व्यवहार करत होता. अदानी पोर्ट्स, अदानी एंटरप्रायझेस, अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, एसीसी आणि अदानी विल्मार हेही नकारात्मक ट्रेड करत होते. तर, अंबुजा सिमेंट, एनडीटीव्ही सकारात्मक दिसत होते.