इन्फोसिसला ६३०० कोटींचा नफा; शेअर उसळल्यानं गुंतवणूकदार संभ्रमात, आता काय करायचं?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  इन्फोसिसला ६३०० कोटींचा नफा; शेअर उसळल्यानं गुंतवणूकदार संभ्रमात, आता काय करायचं?

इन्फोसिसला ६३०० कोटींचा नफा; शेअर उसळल्यानं गुंतवणूकदार संभ्रमात, आता काय करायचं?

Jul 18, 2024 07:11 PM IST

Infosys Quarterly Results : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इन्फोसिसला ६,३६८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. या मजबूत नफ्यामुळं कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली असून शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.

इन्फोसिसला ६३०० कोटींचा नफा; शेअर उसळल्यानं गुंतवणूकदार संभ्रमात, आता काय करायचं?
इन्फोसिसला ६३०० कोटींचा नफा; शेअर उसळल्यानं गुंतवणूकदार संभ्रमात, आता काय करायचं? (REUTERS)

Infosys Q1 Results : देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी इन्फोसिसनं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. त्यानुसार, कंपनीनं या तिमाहीत तब्बल ६३६८ कोटी रुपयांचा करोत्तर नफा (Profit After Tax) कमावला आहे.

मागील वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत यावेळी इन्फोसिसच्या नफ्यात ७.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जूनच्या तिमाहीत इन्फोसिसला ५९४५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मजबूत नफ्याच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसचा शेअर गुरुवारी २ टक्क्यांहून अधिक वाढून १७६४.०५ रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअर्सचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. शेअरचा भाव वाढल्यानं आता नेमकं काय करायचं असा प्रश्न गुंतवणूकदारांपुढं आहे.

कंपनीचा महसूल ३९,३१५ कोटींवर

चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत इन्फोसिसचा महसूल ३९,३१५ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या जून तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात ३.६ टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जून तिमाहीत कंपनीचा महसूल ३७९३३ कोटी रुपये होता. मात्र, इन्फोसिसचा एकत्रित निव्वळ नफा तिमाही आधारावर २०.१ टक्क्यांनी घसरला आहे. मार्च २०२४ च्या तिमाहीत इन्फोसिसचा एकत्रित निव्वळ नफा ७,९७५ कोटी रुपये होता. तर, कंपनीच्या महसुलात तिमाही आधारावर ३.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च २०२४ च्या तिमाहीत कंपनीचा महसूल ३७,९२३ कोटी रुपये होता. जून तिमाहीत इन्फोसिसचा डॉलर महसूल ४७१४ दशलक्ष डॉलर होता.

एका वर्षात शेअरमध्ये २० टक्के वाढ

इन्फोसिसचा शेअर गेल्या वर्षभरात २० टक्क्यांनी वधारला आहे. १८ जुलै २०२३ रोजी कंपनीचा शेअर १,४७५ रुपयांवर होता. इन्फोसिसचा शेअर १८ जुलै २०२४ रोजी १७६४.९५ रुपयांवर पोहोचला आहे. इन्फोसिसच्या शेअरमध्ये यंदा आतापर्यंत १४ टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात इन्फोसिसच्या शेअरमध्ये १८ टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर १४९७.८५ रुपयांवरून १७६४.९५ रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या ४ वर्षांत इन्फोसिसच्या शेअरमध्ये ९५ टक्के वाढ झाली आहे. इन्फोसिसचे बाजार भांडवल ७३०४०४ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

Whats_app_banner