Infosys Q2 Results : देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसनं सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीनं मोठा नफा कमावला आहे. तिमाही निकालानंतर लगचेच कंपनीनं गुंतवणूकदारांना खूशखबर देत प्रति शेअर २१ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
चालू आर्थिक वर्षातील हा पहिला अंतरिम लाभांश आहे. लाभांशासाठी कंपनीनं २९ ऑक्टोबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. तर, ८ नोव्हेंबर २०२४ रोजी डिविडंड शेअरहोल्डर्सच्या खात्यात जमा होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची डिविडंडची रक्कम १६.७ टक्क्यांनी जास्त आहे. इन्फोसिसचे सीएफओ जयेश संघराजका यांनी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना ही माहिती दिली.
याआधी इन्फोसिसनं आर्थिक वर्ष २०२४ साठी २० रुपये अंतिम लाभांश आणि प्रति शेअर ८ रुपये विशेष लाभांश जाहीर केला होता. त्यानंतर १८ रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला होता. मागील आर्थिक वर्षात कंपनीनं एकूण ४६ रुपयांचा लाभांश जाहीर केला होता.
चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा ४.७ टक्क्यांनी वाढून ६,५०६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ६,२१२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तिमाही आधारावर कंपनीच्या नफ्यात २.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल ४.२ टक्क्यांनी वाढून ४०,९८६ कोटी रुपये झाला आहे.
इन्फोसिसनं सलग दुसऱ्या तिमाहीत २०२४-२५ या आर्थिक वर्षातील कमाईचं उद्दिष्ट वाढवलं आहे. आता कंपनीला चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) ३.७५ ते ४.५० टक्के महसुली वाढीची अपेक्षा आहे. हे उद्दिष्ट मागील तिमाहीत दिलेल्या तीन ते चार टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा अधिक आहे.
तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसच्या शेअरमध्ये गुरुवारी वादळी वाढ झाली. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी हा शेअर एनएसईवर २.८४ टक्क्यांनी वधारून १९७४.५५ रुपयांवर पोहोचला. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १९९१.४५ रुपये आहे. तर इन्फोसिसच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक १३५१.६५ रुपये आहे. मागील सहा महिन्यांत कंपनीनं गुंतवणूकदारांना ३९.१३ टक्के परतावा दिला आहे.
संबंधित बातम्या
