Narayana Murthy gift to grandson : काहीच न करता, अगदी लॉटरीचं तिकीटही न काढता कुणी अब्जाधीश होऊ शकतो का? याचं उत्तर कुणीही नाही असंच देईल. पण, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. एकाग्र रोहन मूर्ती या चार महिन्यांच्या बाळाच्या बाबतीत अशीच अपवादात्मक गोष्ट घडली आहे.
रोहन मूर्ती हे चार महिन्यांच बाळ अब्जाधीश झालं आहे. कारण, त्याचे आजोबा इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी त्याला आपल्याकडचे २४० कोटी रुपयांचे शेअर्स भेट म्हणून दिले आहेत.
स्टॉक एक्स्चेंजला मूर्ती यांनी तशी माहिती दिली आहे. त्यानुसार एकाग्रकडे आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे १५ लाख शेअर्स आहेत. कंपनीतील एकूण समभागांपैकी हा आकडा ०.०४ टक्के आहे.
नातवाला दिलेल्या गिफ्टमुळं मूर्ती यांचा कंपनीतील स्वत:चा हिस्सा ०.४० टक्क्यांवरून ०.३६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. शेअर्सचे हस्तांतरण 'ऑफ मार्केट' पद्धतीनं करण्यात आलं, अशी माहिती एक्स्चेंजला देण्यात आली आहे.
इन्फोसिसच्या शेअरहोल्डर्सना मूर्ती यांनी दिलेली ही भेट आवडलेली दिसत नाही. त्यामुळंच की काय, सोमवारी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) कंपनीचा शेअर शुक्रवारच्या तुलनेत २ टक्क्यांनी घसरून १,६०१.८० रुपयांवर बंद झाला.
डिसेंबर २०२३ च्या आकडेवारीनुसार, इन्फोसिसच्या प्रवर्तक समूहाकडे ५४,८६,४३,९७९ शेअर्स आहेत. म्हणजेच, इन्फोसिस लिमिटेडमध्ये प्रवर्तकांचा १४.७८ टक्के वाटा आहे. त्यापैकी नारायण मूर्ती यांची कन्या आणि ब्रिटनच्या फर्स्ट लेडी अक्षता मूर्ती यांच्याकडं १.०५ टक्के म्हणजेच, ३,८९,५७,०९६ शेअर्स आहेत. नारायण मूर्ती यांचे चिरंजीव रोहन मूर्ती यांच्याकडं ६,०८,१२,८९२ शेअर्स आणि पत्नी सुधा एन मूर्ती यांच्याकडं ३,४५,५०,६२६ शेअर्स आहेत.
नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि त्यांची पत्नी अपर्णा कृष्णन यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये बाळाच्या आगमनाची गुड न्यूज दिली होती. एकाग्र असं या नवजात बालकाचं नाव आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. मूर्ती यांची मुलगी अक्षता हिला दोन मुलं आहेत. एकाग्र हे मूर्ती कुटुंबातील तिसरं नातवंड आहे.
संबंधित बातम्या