N R Narayana Murthy Marathi News : आयटी क्षेत्रातील दिग्गज देशातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी बेंगळुरूमध्ये ५० कोटी रुपयांना एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलं आहे. शहरातील प्रसिद्ध किंगफिशर टॉवर्समध्ये १६व्या मजल्यावर हा फ्लॅट असून तो ८४०० चौरस फुटांचा आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, हा व्यवहार ५९,५०० रुपये प्रति चौरस फूट दरानं करण्यात आला आहे. नारायण मूर्ती यांनी घेतलेल्या फ्लॅटमध्ये चार बेडरूम आणि पाच कार पार्किंगचा समावेश आहे. चार वर्षांपूर्वी नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुधा मूर्ती यांनी याच टॉवरच्या २३ व्या मजल्यावर फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅटसाठी २९ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
किंगफिशर टॉवर्स हे ३४ मजली लक्झरी निवासी संकुल असून ते ४.५ एकर जागेवर वसलेलं आहे. यात तीन इमारती असून सुमारे ८१ अपार्टमेंट्स आहेत. टॉवरमधील ४ बीएचके अपार्टमेंट ८००० चौरस फुटांपासून सुरू होतात.
देशातील बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याचा या टॉवर्सशी थेट संबंध आहे. किंगफिशर टॉवर्सच्या जागेवर मल्ल्याचं वडिलोपार्जित घर होतं. त्याच जागेवर आता हे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. २०१० मध्ये प्रेस्टीज ग्रुप आणि मल्ल्या यांच्या कंपनीच्या संयुक्त सहकार्यातून हा प्रकल्प विकसित करण्यात आला होता. हे लक्झरी अपार्टमेंट सुरुवातीला २२ हजार रुपये प्रति चौरस फूट दरानं विकले जात होते.
किंगफिशर टॉवर्समध्ये विविध क्षेत्रातील नामांकित लोकांचं वास्तव्य आहे. बायोकॉनच्या किरण मजूमदार शॉ, फ्लिपकार्टचे सचिन बन्सल, मेन्सा ब्रँड्सचे अनंत नारायणन, झिरोधाचे निखिल कामत आणि कर्नाटकचे मंत्री केजे जॉर्ज यांचा मुलगा राणा जॉर्ज यांच्यासह इतरही अनेक लोक या टॉवर्समध्ये राहतात. या टॉवर्समध्ये असंख्य सुविधा आहेत. या टॉवर्समधील फ्लॅटसाठी तीन महिन्याला सुमारे पाच लाख रुपये मेन्टनन्स द्यावा लागतो.
संबंधित बातम्या