भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींमध्ये गणना होणारे रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी नुकतेच गुजरातच्या गांधीनगर शहरामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. येथील पंडित दिनदयाल एनर्जी युनिवर्सिटीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अंबानी बोलत होते. मुकेश अंबानी यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना जीवन जगण्याचा कानमंत्र दिला. अंबानी यांनी त्यांच्या आयुष्यात पालन केलेली मार्गदर्शक तत्वे विद्यार्थ्यांपुढं विषद केली. अंबानी म्हणाले, ‘जीवन जगताना ज्या तत्वांचे पालन मी केलेत ते मी तुम्हाला सांगतोय. ही गोष्ट तुम्हाला लगेच पटणार नाही. परंतु जीवनात काही काळानंतर याचं महत्व लक्षात येईल. आयुष्यात जसे सुखाचे क्षण येतात तसेच दुःखाचेही क्षण येत असतात. आयुष्यात एकीकडे जसा आनंद दिसतो तसंच दुसऱ्या बाजुने आयुष्य कठीण देखील असतं.
मुकेश अंबांनी यांनी दिनदयाल एनर्जी युनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांना सांगितले की आयुष्यात तुमच्या मनाला पटेल तेच काम काम करा. माणूस आपल्या आवडीच्या क्षेत्रात जेव्हा झोकून देऊन काम करतो तेव्हा कामातून आनंद तर मिळतोच परंतु काम करताना आलेली आव्हाने देखील विकासाच्या संधीसारखी वाटू लागतात.
मुकेश अंबानी म्हणाले की सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. झपाट्याने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात सतत शिकत राहणे हा काही पर्याय राहिलेला नाही. तर आज स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि आपापल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सतत शिकत राहणे आणि ज्ञानार्जन करणे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने नवनवीन गोष्टींबाबतचे कुतूहल कायम ठेवायला हवे. शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद करू नका, असा सल्ला अंबानी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ज्ञान अशी गोष्ट आहे जे दिल्याने अधिक वाढते. आणि दुसऱ्यांना मदत केल्याने स्वतःचा विकास होत असतो, हे लक्षात ठेवा. एकमेकांना सहाय्य करण्यातच आयुष्याची मजा असते.
व्यक्तिगत तसेच व्यावसायीक विकासासाठी नाते जपणे आणि टिकणे आवश्यक असते.‘दिल के रिश्ते’ तयार करा. ते वाढवा. विश्वासाचे नाते निर्माण करून ते मजबूत करा. नात्यातील एकमेकांचा आदर करा. चारित्र्य निर्माणाकडे लक्ष द्या. काळाच्या कसोटीवर टिकून राहिल असे नातेसंबंध तयार करा, असं मुकेश अंबानी म्हणाले.
आपल्या कुटुंबामुळेच आयुष्याला अर्थ आणि दिशा मिळत असते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली प्रेम, करुणा, सहानुभूती, लवचिकता ही मूल्ये आपण कुटुंबातच शिकलेलो असतो.
संबंधित बातम्या