Share Market News : नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात अनेक नव्या कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होत आहेत. इंडोबेल इन्सुलेशन या छोट्या कंपनीनं आज शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. आयपीओमध्ये ४६ रुपये किंमत असलेला कंपनीचा शेअर ९० टक्क्यांच्या वाढीसह ८७.४० रुपयांवर लिस्ट झाला.
जवळपास दुप्पट नफा दिसताच आयपीओ गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. त्याचा थेट परिणाम इंडोबेल इन्सुलेशनच्या शेअर्सच्या किंमतीवर झाला. हे शेअर्स जबरदस्त लिस्टिंगनंतर घसरले. कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी घसरून ८३.०३ रुपयांवर आला.
इंडोबेल इन्सुलेशन ही कंपनी मे १९७२ मध्ये सुरू झाली होती. ही कंपनी इन्सुलेशन उत्पादनांची निर्मिती करते. कंपनीची उत्पादनं निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक अनुप्रयोगांमध्ये वापरली जातात. इंडोबेल इंडियाचे प्रवर्तक विजय बर्मन, मन मोहन बर्मन, मेघा बर्मन आणि रक्षा बर्मन आहेत. आयपीओपूर्वी कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा ९९.९९ टक्के होता, तो आता ६५ टक्क्यांवर आला आहे.
इंडोबेल इन्सुलेशनच्या आयपीओचा आकार १०.१४ कोटी रुपये होता. कंपनीचा आयपीओ ६ जानेवारी २०२५ रोजी बोलीसाठी खुला झाला आणि ८ जानेवारीपर्यंत खुला होता. हा आयपीओ एकूण ५४.१३ पट सब्सक्राइब झाला होता. रिटेल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीचा कंपनीच्या आयपीओमध्ये ५२.३७ पट हिस्सा आहे. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) कॅटेगरीला ५१.३१ पट सब्सक्रिप्शन मिळालं. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार केवळ एका लॉटसाठी गुंतवणूक करू शकत होते. आयपीओच्या एका लॉटमध्ये ३००० शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी १,३८,००० रुपये गुंतवावे लागले.
आयपीओमधून मिळणाऱ्या रकमेतून कंपनी अतिरिक्त प्लांट आणि मशिनरी खरेदी करणार आहे. तसंच, वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करणार आहे. ३० डिसेंबर २०२४ पर्यंत कंपनीचे विविध विभागात ३१ कर्मचारी आहेत.
संबंधित बातम्या