परवडणाऱ्या दरात विमान सेवा उपलब्ध करणारी विमान कंपनी इंडिगो १४ नोव्हेंबरपासून १२ देशांतर्गत मार्गावर बिझनेस क्लास सेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर कंपनी व्यापार विस्तारासाठी ग्राहक लॉयल्टी कार्यक्रमही सुरू करणार आहे.
कंपनीला १८ वर्षे पूर्ण झाल्यामुळे आयोजित एका कार्यक्रमात इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी सोमवारी सांगितले की, बिझनेस क्लासच्या जागांसाठी ६ ऑगस्टपासून बुकिंग सुरू केले जाईल. बिझनेस क्लासच्या प्रवाशांना स्पेशल फूड ऑफर केले जाईल. ए३२१ नियो विमानांमध्ये बिझनेस क्लासच्या १२ जागा असतील.
एल्बर्स यांनी म्हटले की, बिझनेस क्लास सीटसाठी एका मार्गावर प्रवासासाठी भाडे १८,०१८ रुपयांपासून सुरू होईल. या सीट सर्वात व्यस्त व बिझनेस मार्गावर उपलब्ध असतील. याची सुरुवात दिल्ली-मुंबई मार्गावर होईल. कंपनीने यावर्षी २३ मे रोजी निवडक मार्गावर बिझनेस क्लास सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती.
सध्या टाटा ग्रुपच्या मालकीची एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि विस्तारा बिझनेस क्लासची सेवा प्रदान करतात. इंडिगो चालू आर्थिक वर्षात आणखी सात आंतरराष्ट्रीय स्थानांवर उड्डाण सुरू करणार आहे. कंपनी सध्या १२० स्थानांवर रोज २ हजाराहून अधिक उड्डाणांचे संचालन करते. यामधील ३३ परदेशी शहरांचा समावेश आहे.
७ ऑगस्ट २०२४ रोजी भारतातील सर्वात मोठ्या एअरलाइन्सच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त इंडिगोच्या प्रवाशांना आता १८% सूट मिळणार आहे. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी केलेल्या घोषणेनुसार, कंपनीने 'इंडिगो स्ट्रेच' नावाचे नवीन बिझनेस क्लास उत्पादन सुरू केले आहे जे नोव्हेंबरच्या मध्यापासून चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, मुंबईसह 12 मार्गांवर कार्यरत असेल.
इंडिगो देशांतर्गत प्रीमियम प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा फायदा घेण्याच्या विचारात आहे, ६ ऑगस्टपासून आपला नवीन बिझनेस क्लास बुकिंगसाठी खुला झाला आहे आणि १४ नोव्हेंबरपासून प्रवास सुरू होणार आहे.
भाडे १८,०१८ रुपयांपासून सुरू होईल आणि ओबेरॉय हॉटेल्सकडून जेवणाची व्यवस्था केली जाईल. इंडिगो 'ब्लूचिप' लॉयल्टी प्रोग्रामही सुरू करणार आहे, जो सप्टेंबरच्या आसपास सुरू होईल.
इंडिगो चालवणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचा निव्वळ नफा 2,729 कोटी रुपये होता.
कामकाजातून मिळणारे उत्पन्न १७ टक्क्यांनी वाढून १९,५७१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच तिमाहीत १६,६८३ कोटी रुपये होते.
एबिटडा किंवा व्याज, कर, अवमूल्यन आणि अॅमॉर्टायझेशनपूर्वीचे उत्पन्न 4 टक्क्यांनी वाढून 5,160 कोटी रुपये झाले आणि एबिटडा मार्जिन 29.8% च्या तुलनेत 26.4% होते.
सोमवारी, ५ ऑगस्ट २०२४ रोजी व्यवहार सत्रानंतर मुंबई शेअर बाजारात इंडिगोचा शेअर २.००% किंवा ८६.३० अंकांनी घसरून ४२२५.२५ रुपयांवर बंद झाला.