Indigo block deal : शेअरमधील तेजीमुळं स्टॉक मार्केटमध्ये सातत्यानं चर्चेत असलेली इंडिगो ही कंपनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल यांच्या चिंकरपू फॅमिली ट्रस्टनं घेतलेला ब्लॉक डीलचा निर्णय यास कारणीभूत ठरला आहे. या ट्रस्टनं इंडिगो (Interglobe Aviation Ltd)मधील ५.२४ टक्के शेअर (मूल्य ९५४९ कोटी) खुल्या बाजारात विकले आहेत.
मॉर्गन स्टॅनली एशिया (सिंगापूर) पीटीईनं इंटरग्लोब एव्हिएशनमधील ०.७४ टक्के हिस्सा असलेले २८.५४ लाख शेअर्स सरासरी ४,७१४.९० रुपये प्रति शेअर दरानं खरेदी केले. या व्यवहाराचं एकूण मूल्य १३४५.६३ कोटी रुपये होते. इतर खरेदीदारांची माहिती उपलब्ध नाही.
जून अखेरपर्यंत इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये प्रवर्तक आणि प्रवर्तक समूहातील कंपन्यांचा ५५.२९ टक्के हिस्सा होता. राकेश गंगवाल यांच्याकडं ५.८९ टक्के, तर विश्वस्त शोभा गंगवाल आणि डेलावेअरच्या जेपी मॉर्गन ट्रस्ट कंपनीसह चिंकरपू फॅमिली ट्रस्टकडे १३.४९ टक्के हिस्सा होता. भाटिया आणि इंटरग्लोब एंटरप्रायझेस यांची मिळून ३५.९१ टक्के मालकी होती.
गंगवाल यांनी मार्चमध्ये अशाच प्रकारे विक्री केल्यानंतर यंदा इंडिगोचे शेअर्स विकण्याची ही दुसरी घटना आहे. फेब्रुवारी २०२२ पासून गंगवाल आणि त्यांच्या पत्नी शोभा गंगवाल इंडिगोमधील आपला हिस्सा टप्प्याटप्प्यानं कमी करत आहेत.
ऑगस्ट २०२३ मध्ये शोभा गंगवाल यांनी कंपनीचा २.९ टक्के हिस्सा २,८०० कोटी रुपयांना विकला होता. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांनी ४ टक्के हिस्सा २,९४४ कोटी रुपयांना विकला आणि सप्टेंबर २०२२ मध्ये राकेश आणि शोभा गंगवाल या दोघांनी २,७४ टक्के हिस्सा २००५ कोटी रुपयांना विकला.
सहसंस्थापक राहुल भाटिया यांच्याशी मतभेद झाल्यामुळे गंगवाल यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये इंटरग्लोब एव्हिएशन बोर्डाचा राजीनामा दिला आणि पुढील पाच वर्षांत हळूहळू आपला इक्विटी हिस्सा कमी करण्याची योजना जाहीर केली. त्यांच्या पत्नी शोभा गंगवाल यांनी ऑगस्ट २०२३ पर्यंत कंपनीतून पूर्णपणे माघार घेतली होती. आयटीसी लिमिटेड आणि इंडस टॉवर्स लिमिटेड यांच्यातील व्यवहारांनंतर ही विक्री या वर्षीची भारतातील तिसरा सर्वात मोठी ब्लॉक डील आहे.
इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनचा जुलै २०२४ पर्यंतचा देशांतर्गत बाजारपेठेतील हिस्सा ६० टक्क्यांहून अधिक आहे. इंडिगोची सर्वात निकटची प्रतिस्पर्धी एअर इंडिया लिमिटेडचा हिस्सा १४ टक्के आहे.