India's Forex Update News : अलीकडच्या काळात भारताचा परकीय चलनसाठा सातत्यानं घसरत चालला आहे. गेल्या १४ आठवड्यांत भारतानं ७० अब्ज डॉलरपेक्षा जास्त साठा गमावला आहे. ३ जानेवारी २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात तो ६३४.६ अब्ज डॉलरपर्यंत घसरला. २७ सप्टेंबर २०२४ रोजी तो ७०४.९ अब्ज डॉलरच्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा खूपच कमी आहे.
देशाच्या परकीय चलन साठ्यात सुरू असलेली घट किती मोठी किंवा लहान आहे आणि त्याचा देशाच्या आर्थिक हितसंबंधांवर काय परिणाम होईल, हे श्रीदेव कृष्णकुमार यांच्या या अहवालातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
परकीय चलन साठ्यातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण ११ मार्च २०२२ ते १३ मे २०२२ असे ३० आठवडे चालली. या कालावधीत काही आठवड्यांत परकीय चलनात वाढ झाली, परंतु असे आठवडे खूपच कमी होते.
सध्याची घसरण दीर्घकाळ टिकणारी नसली तरी परकीय चलन साठ्याच्या मूल्याच्या दृष्टीनं ही दुसरी सर्वात मोठी घसरण ठरली आहे. ४ ऑक्टोबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ या १४ आठवड्यांमध्ये परकीय साठा ७०.३ अब्ज डॉलरनं कमी झाला आहे. यापूर्वी ३ जून २०२२ ते ४ नोव्हेंबर २०२२ या २३ आठवड्यांच्या कालावधीत ७१.४ अब्ज डॉलरची सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती.
२६ सप्टेंबर २००८ ते १२ डिसेंबर २००८ या कालावधीत जागतिक वित्तीय संकटाच्या काळात रिझर्व्ह फंडात १५.८ टक्क्यांची घसरण झाली होती. त्यानंतर ३ जून २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ११.९ टक्क्यांची दुसरी सर्वात मोठी घसरण नोंदवण्यात आली. याचं कारण अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात केलेली भरमसाठ वाढ होती.
सध्याची घसरण तिसरी सर्वात महत्त्वाची मानली जाऊ शकते, कारण ४ ऑक्टोबर २०२४ पासून एकूण साठा सुमारे ९.९७ टक्क्यांनी कमी झाला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, २२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत भारताकडं ११ महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा साठा होता.
१. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होणे
२. आंतरराष्ट्रीय वित्तीय संकट
३. रुपया हाताळण्यासाठी आरबीआयचा हस्तक्षेप
४. आयातीत वाढ आणि निर्यातीत घट
डॉलरच्या तुलनेत रुपयानं आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठला असताना सध्याचा परकीय चलनसाठा घसरत चालला आहे. अशा वेळी रुपयाचं अवमूल्यन साधारणपणे किती होतं हे समजून घेण्यासाठी 'हिंदुस्तान टाइम्स'नं एकूण साठ्यातील डॉलर आणि रुपयाच्या मूल्यांचा वापर करून प्रॉक्सी विनिमय दर मोजला.
किमान दोन महिने सातत्यानं होत असलेल्या घसरणीच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचं सरासरी २.८ टक्क्यांनी अवमूल्यन झाल्याचं निदर्शनास आलं. सर्वात मोठी घसरण २० एप्रिल ते ७ सप्टेंबर २०१८ या कालावधीत झाली होती. त्यावेळी २१ आठवड्यांमध्ये रुपया १०.१३ टक्क्यांनी घसरला होता. चालू १४ आठवड्यांच्या कालावधीत रुपया मागील दरापेक्षा २.५ टक्क्यांनी घसरला आहे.
परदेशी गुंतवणुकीत झालेली घट आणि आयातीचा वाढता खर्च यामुळं ही परिस्थिती निर्माण झाल्याचं तज्ज्ञ विश्लेषकांचं मत आहे. तसंच रिझर्व्ह बँकेनं बाजारात स्थिरता आणण्यासाठी रुपयाचं अवमूल्यन होऊ दिलं आहे. या निर्णयामुळं अल्पकालीन दिलासा मिळू शकतो, परंतु दीर्घकालीन उपायासाठी व्यापक आर्थिक सुधारणांची आवश्यकता असेल.
संबंधित बातम्या