Hyundai Motor India IPO : देशातील सर्वात मोठा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडनं त्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. तब्बल २५,००० कोटी रुपयांचा हा आयपीओ मंगळवार, १५ ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून गुरुवार, १७ ऑक्टोबरपर्यंत खुला राहणार आहे.
अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे. त्यासाठी प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या आयपीओची किंमत १८६५ ते १९६० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. हा भारतातील सर्वात मोठा आयपीओ असेल. आयुर्विमा महामंडळाची (LIC) २१,००० कोटी रुपयांची समभाग विक्री हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे.
ह्युंदाई मोटर इंडियाच्या आयपीओ लॉट साइजमध्ये ७ इक्विटी शेअर्स मिळतील. या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) ५० टक्क्यांहून अधिक, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑफरचे ३५ टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी ७७८४०० इक्विटी शेअर्स राखीव आहेत. कर्मचाऱ्यांना प्रति समभाग १८६ रुपयांची सवलत दिली जात आहे.
शेअर वाटपाची प्रक्रिया शुक्रवार, १८ ऑक्टोबर रोजी पूर्ण केली जाईल आणि आयपीओ मिळवण्यात अपयशी ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे सोमवार, २१ ऑक्टोबरपासून परत केले जातील. ह्युंदाई मोटर इंडियाचे शेअर्स मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ आज १४७ रुपयांच्या प्रीमियमवर आहे. आयपीओचा अप्पर प्राइस बँड आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेता ह्युंदाई मोटर इंडियाच्या शेअरची अंदाजित लिस्टिंग किंमत २१०७ रुपये प्रति शेअर असू शकते. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण होत आहे. आज ग्रे मार्केटमध्ये हा शेअर १४७ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे, तर ७ ऑक्टोबरला हा शेअर २७० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध होता. ३ ऑक्टोबरला त्याचा जीएमपी ३६० रुपये आणि २८ सप्टेंबरला जीएमपी ५०० रुपये होता.
संबंधित बातम्या