IRFC Share Price : बुलेटच्या वेगानं पळतोय रेल्वेचा हा शेअर, भाव पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह होईल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IRFC Share Price : बुलेटच्या वेगानं पळतोय रेल्वेचा हा शेअर, भाव पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह होईल!

IRFC Share Price : बुलेटच्या वेगानं पळतोय रेल्वेचा हा शेअर, भाव पाहून तुम्हालाही खरेदीचा मोह होईल!

Jan 15, 2024 05:58 PM IST

IRFC Share Price : सरकारी रेल्वे कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशननं आज मकर संक्रांतीच्या दिवशी गुंतवणूकदारांना गोड बातमी दिली आहे.

IRFC Share Price
IRFC Share Price

IRFC Share Price : रेल्वे क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स आज एका क्षणी १८.५० टक्के वाढीसह १३४.५० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. 

आयआरएफसीच्या गुंतवणूकधारकांसाठी मागील संपूर्ण वर्ष स्वप्नवत ठरलं आहे. मागच्या अवघ्या एका कॅलेंडर वर्षात आयआरएफसीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना जवळपास ३०० टक्के परतावा मिळवून दिला आहे. नव्या वर्षातही शेअरची घोडदौड सुरूच राहील असे संकेत मिळत आहेत.

PM Janman : गोड बातमी! पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना पोहोचला ५४० कोटी रुपयांचा पहिला हप्ता

तब्बल ४०० टक्क्यांची वाढ

आज सकाळी बीएसईवर कंपनीचा शेअर ११६.२० रुपयांवर खुला झाला. मात्र, काही वेळातच तो १३४.५० रुपयांच्या इंट्रा-डे उच्चांकावर पोहोचला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये कंपनीच्या शेअर्सची किंमत सुमारे ३० रुपये होती. २०२१ मध्ये आयआरएफसीचा IPO आला, तेव्हा शेअरची किंमत २६ रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंतची आकडेमोड पाहता कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

सरकारच्या आशीर्वादामुळं तेजी? 

इंडियन रेल्वे फायनास कॉर्पोरेशनच्या शेअरची किंमत उत्तरोत्तर वाढण्यामागे केंद्र सरकारकडून सातत्यानं मिळणारा पाठिंबा हे प्रमुख कारण मानलं जात आहे. सध्याच्या सरकारनं रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केलं आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या शेअर्समध्ये सध्याची तेजी यापुढंही कायम राहण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचा पुढील अंतरिम अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या बाबतीत मोठी घोषणा होऊ शकते, अशी अपेक्षा आहे.

Wipro Share Price : गुंतवणूकदारांची संक्रांत गोड! आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, विप्रोनं गाठला उच्चांक

सरकारचा ८६ टक्के हिस्सा

आयपीओ आल्यापासून साधारण आठ ते दहा महिने स्थिर राहिलेला आयआरएफसीचा शेअर नंतर क्रमाक्रमानं वाढतच आहे. गेल्या ६ महिन्यांत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्सच्या किमती २९५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. या कंपनीत सरकारची एकूण भागीदारी ८६.३६ टक्के आहे. मात्र, येत्या काळात नियमानुसार सरकारला आपला वाटा काही प्रमाणात कमी करावा लागणार आहे. त्यामुळं सरकारकडून कंपनीचे शेअर्स विकले जाण्याची शक्यता आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील लेखात केवळ कंपनीच्या शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner