IOB Share : इन्कम टॅक्स विभाग १,३५९ कोटींचा रिफंड देणार हे कळताच बँकेचा शेअर उसळला! भाव ६० रुपयांपेक्षाही कमी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IOB Share : इन्कम टॅक्स विभाग १,३५९ कोटींचा रिफंड देणार हे कळताच बँकेचा शेअर उसळला! भाव ६० रुपयांपेक्षाही कमी

IOB Share : इन्कम टॅक्स विभाग १,३५९ कोटींचा रिफंड देणार हे कळताच बँकेचा शेअर उसळला! भाव ६० रुपयांपेक्षाही कमी

HT Marathi Desk HT Marathi
Dec 11, 2024 08:43 PM IST

IOB Share Price : इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअरमध्ये बुधवारी ४.६६ टक्क्यांची वाढ झाली. इन्कम टॅक्स विभागानं जाहीर केलेली माहिती यासाठी कारणीभूत ठरली आहे.

इन्कम टॅक्स विभागानं दिला तब्बल १,३५९ कोटींचा रिफंड; खरेदीसाठी नुसती झुंबड, बँकेचा शेअर उसळला!
इन्कम टॅक्स विभागानं दिला तब्बल १,३५९ कोटींचा रिफंड; खरेदीसाठी नुसती झुंबड, बँकेचा शेअर उसळला!

IOB Share News In Marathi : सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअरमध्ये बुधवारी वादळी वाढ पाहायला मिळाली. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी हा शेअर ४.६६ टक्क्यांनी वधारला आणि ५९.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. प्राप्तिकर विभागाकडून १,३५९ कोटी रुपयांचा कर परतावा मिळाल्याचं कंपनीनं जाहीर केल्यानंतर बँकेच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

इंडियन ओव्हरसीज बँकेनं शेअर बाजाराला इन्कम टॅक्स रिफंड विषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, १७ ऑगस्ट २०२४ च्या आदेशानुसार प्राप्तिकर कायद्याच्या कलम २४४ अ अंतर्गत व्याजासह २०१५-१६ या कर निर्धारण वर्षासाठी बँकेला मिळणाऱ्या परताव्याची रक्कम १३५९ कोटी रुपये आहे. प्राप्तिकर पोर्टलच्या माध्यमातून १० डिसेंबर २०२४ रोजी हा आदेश प्राप्त झाला असून १० डिसेंबर रोजी बँकेलाही यासंदर्भातील माहिती मिळाली.

या शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ८३.८० रुपये आहे, तर ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४०.७१ रुपये आहे. प्रवर्तकांचा बँकेत हिस्सा ९६.३८ टक्के आहे. तर, सार्वजनिक भागधारकांकडे ३.६२ टक्के हिस्सा आहे. 

बँकेला स्वातंत्र्यपूर्व काळाचा वारसा

इंडिया ओवरसीज बँकेची स्थापना १९३७ मध्ये स्थापन झाली होती. कराईकुडी, मद्रास (चेन्नई) आणि रंगून (यांगून) इथं एकाच वेळी शाखा उघडून बँकेनं आपला प्रवास सुरू केला. चेन्नई इथं मुख्यालय असलेली ही बँक रिटेल बँकिंग, पर्सनल बँकिंग, मर्चंट बँकिंग आणि डिजिटल बँकिंग सेवा अशा विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करते.

कशी आहे बँकेची आर्थिक स्थिती?

चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत इंडियन ओव्हरसीज बँकेचा निव्वळ नफा २४ टक्क्यांनी वाढून ७७७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेला ६२५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न वाढून ८,४८४ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते ६,९३५ कोटी रुपये होतं. सप्टेंबर तिमाहीत बँकेचं व्याज उत्पन्न ६,८५१ कोटी रुपये होतं. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते ५,८२१ कोटी रुपये होतं.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner