केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (National Democratic Alliance) सरकार निवडून आल्याबद्दल मध्य पूर्वे आणि आखाती देशांमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीय उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भारतात गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या जागतिक कंपन्यांना प्रोत्साहन मिळेल, असं मत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या उद्योजकांनी व्यक्त केलं आहे.
‘नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गेल्या दहा वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारताची प्रतिमा जागतिक पातळीवर मैत्रीपूर्ण बनवली आहे. त्याचा फायदा परदेशातील भारतीयांना होत आहे. भारतीयांना पूर्वीपेक्षा अधिक सौजन्यशील व आदराची वागणूक मिळत आहे. आम्ही संयुक्त अरब अमिरात व आखाती देशांमध्ये याचा अनुभव घेत आहोत. मोदींच्या तिसऱ्या कारकीर्दीत भारतीय व्यापार, उद्योग व अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक जोमाने चालना मिळेल, यात शंका नाही.’ अशी प्रतिक्रिया दुबईस्थित अदिल ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केली आहे.
'नरेंद्र मोदी यांनी भारतात गुंतवणूक करण्याची प्रक्रिया सहज आणि सोपी केली आहे. आता तिसऱ्यांदा एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे केवळ अनिवासी भारतीयच नव्हे तर जागतिक गुंतवणूकदारांचासुद्धा आत्मविश्वास बळावेल, असं मत मध्य पूर्वेतील लूलू ग्रूप उद्योगसमूहाचे संचालक युसूफ अली यांनी व्यक्त केलं आहे.
ज्वेलरी क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या जॉय अल्लूकास उद्योग समूहाचे चेअरमन जॉय अल्लूकास यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले असून सोने आणि ज्वेलरी क्षेत्राच्या विकासासाठी भरीव योजना सरकार जाहीर करेल अशी आशा व्यक्त केली. ‘एक उद्योजक या नात्याने भारतात व्यापार आणि उद्योग वाढीसाठी नव्या सरकारने अधिकाधिक लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा करतो’ असं जॉय लुकास यांनी सांगितले.
संयुक्त अरब अमिरात येथील डेन्यूब ग्रूपचे संस्थापक आणि संचालक रिझवान साजन म्हणाले, ‘सरकारच्या सरलीकृत कर संरचनांमुळे आमच्यासारख्या अनेक ब्रँडना अधिक व्यवसाय निर्माण करण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यास मदत झाली आहे. ही प्रक्रिया अशीच सुरू राहून देशाची आर्थिक प्रगती होईल अशी आम्ही आशा करतो’ असं साजन म्हणाले.
संबंधित बातम्या