आयातदार ते निर्यातदार! भारतानं विकली तब्बल 'इतक्या' कोटींची शस्त्रे; 'या' विशेष देशांच्या यादीत मिळवलं स्थान
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  आयातदार ते निर्यातदार! भारतानं विकली तब्बल 'इतक्या' कोटींची शस्त्रे; 'या' विशेष देशांच्या यादीत मिळवलं स्थान

आयातदार ते निर्यातदार! भारतानं विकली तब्बल 'इतक्या' कोटींची शस्त्रे; 'या' विशेष देशांच्या यादीत मिळवलं स्थान

Updated Jul 23, 2024 09:51 AM IST

indian defence exports: संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद हळू हळू वाढत चालली आहे. संरक्षण सामग्रीचे वाढते उत्पादन व निर्यात या क्षेत्रात देशानं केलेली प्रगती दर्शवते. यावर्षी सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची निर्यात भारतानं केली आहे.

आयातदार ते निर्यातदार! भारतानं विकली तब्बल 'इतक्या' कोटींची शस्त्रे; 'या' विशेष देशांच्या यादीत मिळवलं स्थान
आयातदार ते निर्यातदार! भारतानं विकली तब्बल 'इतक्या' कोटींची शस्त्रे; 'या' विशेष देशांच्या यादीत मिळवलं स्थान

indian defence exports : भारत संरक्षण साहित्य उत्पादन आणि निर्यात क्षेत्रात भरारी घेत आहे. भारताचे संरक्षण उत्पादन क्षेत्राचा गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने विकास होत आहे. संरक्षण सामग्री व शस्त्रास्त्र निर्यातीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुले देशाच्या आर्थिक प्रगतीत भर पडली आहे. भारताने २०२३-२४ या वर्षात संरक्षण साहित्य निर्यातीचा पूर्वीचा विक्रम मोडला असून यावर्षी सुमारे २.५ अब्ज डॉलरच्या संरक्षण सामग्रीची निर्यात देशानं केली आहे. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत आता भारतानं स्थान मिळवलं आहे. तसेच सर्वात मोठा शस्त्र आयातदार अशी ओळख असलेल्या देशाची आता शस्त्र निर्यातदार म्हणून देखील ओळख निर्माण होऊ लागली आहे.

सोमवारी जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, भारतातील सुमारे १०० खाजगी कंपन्या त्यांच्या संरक्षण वस्तूंची व शस्त्रास्त्रांची विक्री व निर्यात जगभरात करत आहेत. यामध्ये डॉरनीअर २२८ विमाने, तोफखाना, ब्राम्होस सुपर सॉनिक क्षेपणास्त्र, क्रूझ क्षेपणास्त्र, पिनाका मल्टी रॉकेट लाँचर सिस्टम, रडार, सिम्युलेटर आणि आर्मर्ड वाहनांचा समावेश आहे.

भारताच्या संरक्षण निर्यातीत सातत्याने होत आहे वाढ

भारताची संरक्षण निर्यात २०२२ मध्ये सुमारे १.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती. ही निर्यात २०२३ मध्ये वाढली. २०२३ मध्ये भारताची शस्त्र निर्यात २ अब्ज अमेरिकन डॉलर्स ऐवढी होती. यावर्षी या निर्यातीत वाढ झाली आहे. २०२४ मध्ये सुमारे २.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची शस्त्रास्त्र निर्यात भारताने केली आहे. हा आकडा गाठल्यानंतर, भारत आता जगातील २५ शस्त्रास्त्र निर्यातदार देशांपैकी एक बनला आहे जे सर्वाधिक शस्त्रे निर्यात करतात. भारत सरकारने संरक्षण साहित्य व शस्त्रास्त्र क्षेत्रातील निर्यात वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत, भविष्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारने अद्याप खरेदीदार देशांची नावे सार्वजनिक केलेली नाहीत, परंतु आर्मेनिया आणि इंडोनेशिया या देशांना प्रधान्याने शस्त्रास्त्रांची निर्यात केली आहे. पिनाका रॉकेट, आकाश हवाई संरक्षण प्रणालीसाठी भारताने अर्मेनियाशी करार केला असून संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारताचे संरक्षण सामग्रीचे उत्पादन या वर्षी १.२६ लाख कोटी रुपयांचे होते, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढले आहे.

भारत जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश

भारत आजही जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश आहे. २०१९ ते २०२३ दरम्यान, भारताने जगभरात विकल्या गेलेल्या सुमारे १० टक्के शस्त्रे खरेदी केली. पण आता हळू हळू शस्त्र आयातदार अशी ओळख असणारा देश आता शस्त्र निर्यात करू लागला आहे. या निर्यातीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

हे आहेत जगातील सर्वात मोठे देश

अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी आणि चीन हे जगातील सर्वाधिक शस्त्र विक्री करणारे पाच देश आहेत. या देशांचा जगातील शस्त्रास्त्र बाजारपेठेतील वाटा हा ७५ टक्के आहे.

अमेरिका शस्त्रास्त्र निर्यातीत आघाडीवर

जगात सर्वाधिक शस्त्र विक्री करणारा देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. सगळ्यात जास्त शस्त्र विकण्यात अमेरिका देश आघाडीवर आहे. आत्तापर्यंत अमेरिकेने ३७ टक्के शस्त्र विकली आहेत. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमाकांवर रशिया आहे. त्यांनी आत्तापर्यंत २० टक्के शस्त्रास्त्रांची विक्री केली आहे. यानंतर शस्त्र निर्यादार म्हणून फ्रान्सचा क्रमांक लागतो. त्यानंतर जर्मनी ५.५ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे. चीन ५ व्या क्रमांकावर आहे असून त्यांचा वाटा ५.२ टक्के आहे.

पाच सर्वात मोठे शस्त्र खरेदीदार

सौदी अरेबिया, भारत, इजिप्त, ऑस्ट्रेलिया आणि चीन हे जगातील पाच सर्वात मोठे शस्त्र खरेदी करणारे देश आहेत असा अहवाल स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच स्पिरीने जाहीर केला आहे. दरवर्षी हा अहवाल सादर केला जातो.

Whats_app_banner